पालघर: चांदीच्या विटांची तस्करी करणारे जहाज पालघर तालुक्यातील वडराई समुद्रकिनाऱ्यावर लागल्यावर ग्रामस्थांनी केलेल्या लूटमारीच्या घटनेला तब्बल ३० वर्षांंचा कालावधी उलटल्यानंतर काही प्रमाणात त्याची पुनरावृत्ती झाली आहे. तौक्ते चक्रीवादळात भरकटलेले आणि नादुरुस्त झालेला तराफा (बार्ज) याच परिसरात अडकून पडला असून आता त्यावरील विविध प्रकारची साधनसामग्री लुटण्याचा स्थानिकांनी सपाटा लावला आहे.
३० एप्रिल १९९१ रोजी वडराई व शिरगाव दरम्यान असलेल्या कचकडा बागेच्या परिसरात तस्करी करणारी एक बोट किनाऱ्यावर लागली होती. या बोटीमधील चांदीच्या विटा व इतर साधनसामग्रीची लूट ग्रामस्थांनी केली होती. या चोरलेल्या विटांची पुनप्र्राप्ती करण्याच्या प्रक्रियेत स्थानिकांना मोठय़ा जाचाला सामोरे जावे लागले व ३ जानेवारी १९९२ रोजी या प्रकरणात तक्रार दाखल होऊन पुढे हा संपूर्ण छळ प्रकार ‘वडराई चांदी प्रकरण’ म्हणून अनेक वर्षे गाजत राहिले.
१७ मे रोजी झालेल्या चक्रीवादळा दरम्यान ‘गॅल कंन्स्ट्रक्टर’ या कंपनीचा तराफा समुद्रात भरकटला होता तो १८ मे रोजी वडराई किनाऱ्यावर लागला. या तराफ्यावरील ३१ खलाशांची सुखरूप सुटका झाल्यानंतर या नादुरुस्त तराफ्याची दुरुस्ती करण्याचे आव्हान होते.
तराफ्यात असलेले डिझेल इंधनाची गळती झाल्यानंतर गळती होणारे इंधन समुद्रात पसरू नये या दृष्टीने ते बाहेर काढून त्याची विल्हेवाट करण्याची योजना काही काळ वादग्रस्त ठरली होती.
पालघर किनाऱ्यावर हा तराफा लागल्यानंतर त्याला काही ठिकाणी चिरा पडल्याचे सांगण्यात येते. हा तराफा दुरुस्त होण्यापलीकडच्या अवस्थेमध्ये असून त्यामधील तीन हजार टनापेक्षा अधिक भंगाराचा विमा कंपनी लिलाव करून याच ठिकाणी विल्हेवाट करेल असे सांगण्यात येते. या तराफ्यावरील भंगार साहित्य, नट- बोल्ट व इतर सामग्री पालघर येथील भंगार व्यापाऱ्यांकडे खरेदीसाठी येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
३० वर्षांपूर्वी घडलेल्या वडराई चांदी प्रकरणात अनेक स्थानिकांना कारावास भोगावा लागला होता. अशा प्रसंगातून बोध घेण्याऐवजी काही मंडळींनी पुन्हा वडराई किनाऱ्यावर लागलेल्या बार्जमधून बेसुमार लूटमारीचा प्रकार सुरू ठेवला आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांचे अपयश
हा निर्मनुष्य तराफा सध्या वडराई खाडी मुखापासून काही अंतरावर समुद्रात आहे. परिसरातील काही नागरिकांनी होडय़ा व फायबर बोटींच्या मदतीने या तराफ्यावर प्रवेश करून त्या तराफ्यावरील यंत्रसामुग्री, बिनतारी संदेश व संपर्क साधण्याची यंत्रणा, कपडे, चादरी, बिछाना, प्लस्टिक दोर, प्लास्टिकच्या वस्तू, तांब्याच्या प्लेट, लोखंडी अँगल तसेच नियमित वापरात येणाऱ्या तसेच इतर वस्तूंची चोरी करण्यास सुरुवात केली आहे. ओहोटी-भरतीच्या अनुषंगाने स्थानिक मंडळी तराफ्यावर जाऊन मिळेल ते साहित्य चोरून आणत असून या प्रकारावर अंकुश ठेवण्यास सातपाटी पोलिसांना अपयश आले आहे.