पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असताना पालघर तालुक्यात जून महिन्यापासून आजतागयत दीडशेपेक्षा अधिक बालकांना करोनाने ग्रासले आहे. जून महिन्यात तालुक्यात झालेल्या ३६ मृतांमध्ये एका नवजात बालकाचा समावेश आहे. ही चिंताजनक परिस्थिती असली तरी जिल्ह्यात पूर्णवेळ बालरोज तज्ज्ञ उपलब्ध असून तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.
मार्च २०२० पासून जिल्ह्यामध्ये करोना रुग्ण आढळू लागले होते. दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता भासत होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये दुपटीपेक्षा अधिक रुग्ण संख्या व मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत सुमारे ३४ हजार नागरिकांना आजाराचा संसर्ग झाला होता व त्यापैकी ८०६ रुग्णांचा मृत्यू ओढवला होता.
जून महिन्यात पालघर तालुक्यात १८०७ करोना रुग्ण आढळले असून, रुग्णवाढीचा दर ६.२१ टक्के नोंदविण्यात आला होता. या रुग्णांपैकी १५२ रुग्ण हे पंधरा वर्षांखालील असल्याचे दिसून आले आहे. बालकांमध्ये आढळून आलेला करोना संसर्ग हे चिंतेचे कारण ठरत आहे.
करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत बालके अधिक प्रमाणात प्रभावित होतील या शक्यतेमुळे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने
विविध आरोग्य केंद्रे व करोना
उपचार केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांचे विशेष प्रशिक्षण हाती घेतले आहे. त्याच पद्धतीने बालकांवर करोना उपचार करण्याऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे
ऑनलाइन प्रशिक्षण सुरू आहे.
सध्या आढळून आलेल्या बालकांमधील करोना आजाराची तीव्रता कमी असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून सांगण्यात आले. जिल्ह्याात पूर्णवेळ बालरोगतज्ज्ञ उपलब्ध असून तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले.
आकडेवारीबाबत संभ्रम
पालघर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्याातील रुग्णवाढ, झालेले मृत्यू तसेच आजारातून बरे झालेल्या रुग्णांची माहिती संकलित स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येते. या आकडेवारीत ३ जुलैपासून १३ जुलैपर्यंत अशा सलग ११ दिवस वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात दररोज ७३ रुग्णसंख्येत वाढ दर्शवण्यात आली आहे. हे पाहता जिल्हा आरोग्य विभागाकडून अशा अहवालाच्या प्रस्तुतीकरणाबाबत गांभीर्य नसून अशा अहवालाच्या माध्यमातून फक्त औपचारितेचा भाग पूर्ण केला जात आहे. यामुळे जिल्ह्याातील करोना आकडेवारीच्या सत्यतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागांत ३२ नवे रुग्ण
पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत गेल्या २४ तासांत ३२ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी २४ रुग्ण पालघर तालुक्यातील आहेत. त्याचबरोबर डहाणूत पाच तर वसईच्या ग्रामीण पट्ट्यात तीन नवे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात एकही नवीन करोना रुग्णाची मृत्यू नोंद नाही. ग्रामीण भागांत सध्या ५६३ उपचाराधीन रुग्ण असून त्यापैकी पालघर तालुक्यात २५९, वाडा १३६, डहाणू ९१, वसईच्या ग्रामीण भागांत ४५ तर विक्रमगडमध्ये २५ रुग्णांचा समावेश आहे.