कासा: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील उड्डाणपुलाखाली मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. सध्या पाऊस चालू असल्यामुळे रस्त्याच्या कडेने फिरणारी ही जनावरे पाऊस लागू नये म्हणून उड्डाणपुलाखाली जमा होतात.
चारोटी गाव परिसरात अनेक पाळीव जनावरांना सकाळी मोकाट सोडले जाते. ही जनावरे मुबंई-अहमदाबाद महामार्गाच्या बाजूने फिरत असतात. महामार्गाच्या दुभाजकावर उगवणारे गवत खाण्यासाठी ती दुभाजकावर ही जातात व अचानक रस्त्यावर येतात. वाहनचालकांना दुभाजकावर असणाऱ्या झाडामध्ये असलेल्या मोकाट जनावरांचा अंदाज येत नाही. त्यामुळे ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्यामुळे अनेकदा अपघात झाले आहेत.
या अपघातामध्ये अनेक मोकाट जनावरांचे प्राणही गेले आहेत तर अपघातग्रस्त वाहनाचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने पाऊस आल्यानंतर चारोटी परिसरातील ही मोकाट जनावरे उड्डाणपुलाखालील रस्त्यावर निवारा शोधतात. त्यामुळे वाहनचालकांना याचा त्रास होतो. बऱ्याचदा या मोकाट जनावरांच्या झुंजी लागून त्याचाही त्रास वाहनचालकांना होत आहे. तरी आयआरबी प्रशासन तसेच चारोटी ग्रामपंचायत यांनी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.
चारोटी उड्डाणपुलाखालील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात मोकाट जनावरे जमा होत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाखालून जाताना या जनावरांचा धक्का लागून अनेकदा अपघात होत आहेत. तसेच ही मोकाट जनावरे अनेकदा महामार्गावरही फिरतात, त्यामुळेही अपघात होतात. तरी या जनावरांचा बंदोबस्त करावा.
– सुरेश धांगडा, स्थानिक वाहनचालक