नीरज राऊतपालघर: पावसाळी आणि हिवाळी पर्यटनासाठी थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या जव्हार या मिनी महाबळेश्वरस्थळी उन्हाळ्यातही गारवा तसेच बारमाही हिरवाई राहण्यासाठी यंदा सुरू असलेल्या पावसाळ्यात आतापर्यंत सव्वा सहा लाख झाडांची लागवड करण्यात आली आहे. जव्हारचे ‘हिल स्टेशन’मध्ये रूपांतर करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी जिल्हा मुख्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला अधिक बळ मिळाले असून पर्यटकांनीही या घोषणेचे स्वागत केले आहे.
मुख्यमंत्री १२ फेब्रुवारी रोजी जव्हारमध्ये आले असता त्यांनी हवाईमार्गे जव्हार या ठिकाणाची पाहणी केली. येथील डोंगरात व तसेच इतर ठिकाणी मोकळ्या जागा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. ते पाहून जव्हार परिसरात बारामाही हिरवळ राहावी म्हणून त्यांनी विशेष योजना शहरासाठी आखण्याची सूचना दिली होती, त्या अनुषंगाने मंत्रालयात उच्चस्तरीय समिती गठित करून जव्हार परिसरात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम यंदा हाती घेण्यात आला.
यंदाच्या पावसाळ्यात जव्हार परिसरात सुमारे सव्वा सहा लाख रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी वनविभागाने चार लाख ३२ हजार, सामाजिक वनीकरण विभागाने ९८ हजार ५०० तर कृषी विभागाने ९० ते ९५ हजार रोपांची लागवड केल्याची माहिती पुढे आली आहे.
सामाजिक वनीकरण विभागातर्फे यंदाच्या पावसाळ्यात ४२ पडीक लाभार्थ्यांंकडे असलेल्या १२.६० हेक्टर जमिनीवर २६ हजार २५० रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने ३० किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामांतर्गत १५ हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ६१.५० किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचे योजनेअंतर्गत ५७ हजार ६०० झाडांची लागवड करण्यात आली असून सामाजिक वनीकरण विभागातर्फे एकंदर ९८ हजार ८५० वृक्ष लागवड करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये साग, बांबू, काजू, शिसम, आवळा, कांचन, करंज, सीताफळ, बोर, बेल, चिंच, महारुख, कडुलिंब, रिठा, मोहा, जांभूळ, पळस, आपटा, बाहवा, शिशु इत्यादी प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे.
याच बरोबरीने कृषी विभागाने सुमारे ५०० हेक्टर जागेत जागेवर काजू व आंब्याची लागवड केली असून त्यामध्ये ८० हजार काजूची झाडं तर दहा हजार आंब्याची झाड यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी कृषी विभागाने जव्हारच्या परिसरात एक लाख काजूची झाडांची लागवड केली असून काजूची रोपे ही रत्नागिरी येथून खास मागविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वनविभागातर्फे साडेचार लाख वृक्ष लागवड
वनविभागाने ७०५ हेक्टर क्षेत्र जमिनीवर चार लाख ३२ हजार पेक्षा अधिक झाडांची लागवड केली आहे. या लागवडीमध्ये जव्हार तालुक्यतात २५० हेक्टर (१,८६,६५० झाडे), वाडा तालुक्यात २७५ हेक्टर (१,४१,१६० झाडे), विक्रमगड ताल्यक्यात ११५ हेक्टर (५९,४४० झाडे) व मोखाडा तालुक्यात ६५ हेक्टर (४४,८८५ झाडे) जागेचा समावेश आहे. लागवडीमध्ये स्थानिक प्रजातींचा समावेश आहे. वन विभागाने ऐन, हिरडा, बेहडा, वड, पिंपळ, उंबर, शिवण, करंज, शिरस, साग, बांबू इत्यादी प्रजातींचा समावेश आहे. १९१८ साली स्थापन झालेल्या जिल्ह्यातील सर्वात जुन्या नगरपरिषदेला थंड हवेचे ठिकाणात रूपांतर करण्यासाठी ही लागवड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
निधीची अडचण
वनविभागाने लागवड करताना सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिका मधील दीड- दोन वर्षांंच्या रोपांचा वापर केला असून लागवडीकरता निधी उपलब्ध झाला नसल्याने लागवड करणाऱ्यांकडून पैशाची मागणी होत आहे. जिल्हा विकास निधी अंतर्गत वनविभागाच्या मोठय़ा प्रमाणात वर्गीकरण करण्याच्या प्रकल्पाचा आखणी करण्यात आली होती. जिल्हा नियोजन विभागाकडे राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर लागवडीकरता झालेल्या खर्च तातडीने अदा करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.