विरार : वसई-विरार परिसरात करोना प्रादुर्भाव कमी झाला असला तरी पालिकेकडून नियमांचे पालन करण्याची सक्ती केली आहे तरी नागरिक नियमांचे पालन करत नाहीत. अशाच हजारो नागरिकांवर पालिकेने मागील दोन महिन्यांत कारवाई करत १२ लाख ३४ हजार १५० रुपयाची दंडवसुली केली आहे.
जून महिन्यापासून करोना वैश्विक महामारीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पालिकेकडून करोना टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. पण त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने करोना नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. पालिकेकडून दैनंदिन बाजार, दुकाने, मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. यामुळे शहरात नागरिकांचा वावर वाढला आहे. पण त्यांना मुखपट्टय़ाचा वापर बंधकारक केला आहे. मुखपट्टय़ाचा वापर न करणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.त्यानुसार पालिकेच्या सर्वच प्रभागात कारवाई करण्यात येत आहे.
पालिकेकडून प्रभागानुसार १ जुलै ते २१ ऑगस्ट मध्ये कारवाई करण्यात आली. प्रभाग समिती अ ६७१ मध्ये मुखपट्टय़ाचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत १ लाख ३४ हजार २०० रुपयांची दंड वसुली केली आहे. प्रभाग समिती ब मध्ये ७३० नागरिकांवर कारवाई करत १ लाख ४६ हजाराची वसुली केली आहे. प्रभाग समिती सी मध्ये ८०५ नागरिकांवर कारवाई करत १ लाख ६१ हजार रुपये दंड वसुली केली आहे.
प्रभाग समिती डी मध्ये ६९२ नागरिकांवर कारवाई करत १ लाख ६५ हजार ४००, प्रभाग समिती ई मध्ये ४६८ नागरिकांवर कारवाई केली आहे. यात ९३ हजार ७५० रुपये, प्रभाग समिती एफ मध्ये मुखपट्टय़ाचा वापर न करणाऱ्या ३४१ नागरिकांवर कारवाई करत ७१ हजार २०० हजार रुपये, प्रभाग समिती जी मध्ये १३३५ नागरिकांवर कारवाई करत २ लाख ६७ हजार रुपयाची दंड वसुली केली आहे. प्रभाग समिती एच मध्ये ३३२ जणांवर कारवाई करत ६६ हजार ४०० रुपयाची दंड वसुली केली आहे. आणि प्रभाग आय मध्ये ६६४ जणांवर कारवाई करत १ लाख २९ हजार २०० रुपयाची दंड वसुली केली आहे.
पालिकेने निर्बंध कमी केल्याने शहरात अनेक ठिकाणे गर्दीने फुलून जात आहेत. त्यातही नागरिक नियमनाचे पालन करत नसल्याने यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे.