पालघर : दोन कुटुंबांमध्ये झालेल्या मारामारीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यातील (Palghar Crime) बोईसरमधील शिवाजीनगर भागात हा प्रकार घडला. मयत महिलेच्या मुलीने व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेटसवरुन (WhatsApp status) दोन कुटुंबात हाणामारी झाली होती. 10 फेब्रुवारीला दोन गटांमध्ये ही वादावादी झाली होती. यावेळी 46 वर्षीय महिलेलाही बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. लीलावती देवी प्रसाद असं मयत महिलेचं नाव आहे. बोईसर पोलीस ठाण्यात कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (culpable homicide) दाखल करण्यात आला आहे. दोन महिलांसह तिघा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मयत लीलावती देवी प्रसाद यांची 20 वर्षांची मुलगी प्रिती प्रसाद हिने व्हॉट्सअॅपवर स्टेटस टाकले होते. मात्र तिच्या शेजारी राहणाऱ्या 17 वर्षीय मैत्रिणीला ते खटकले.
अल्पवयीन मैत्रीण, तिची आई आणि भाऊ असे तिघे 10 फेब्रुवारीला प्रितीच्या घरी गेले. यावेळी दोन कुटुंबांमध्ये व्हॉट्सअॅपवर स्टेटसवरुन वाद झाला. भांडणाचं पर्यवसन हाणामारीत झालं. या मारामारीत लीलावती देवी प्रसाद यांच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र शुक्रवारी, 13 फेब्रुवारी रोजी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, महिलेला आरोग्याच्या इतरही समस्या होत्या पण मारामारीदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाला. पीडित तरुणी प्रिती प्रसादच्या तक्रारीच्या आधारे, बोईसर पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, तिची आई, भाऊ आणि बहीण यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 304 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला.
बोईसर पोलिस स्टेशनचे प्रमुख इन्स्पेक्टर सुरेश कदम म्हणाले, “आम्ही ते व्हॉट्सअॅप स्टेटस उघड करू शकत नाही, परंतु अल्पवयीन तरुणीने वैयक्तिकरित्या मनाला लावून घेण्याची गरज नव्हती.” इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलीला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.