नवी दिल्ली | सरकारच्या आत्मनिर्भर भारत या धोरणाला चालना देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने पहिलं स्वदेशी 4जी नेटवर्क लाँच केलं आहे. या पहिल्या स्वदेशी नेटवर्कला भारतीय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बनवण्यात आलं आहे. यासंदर्भात दुरसंचार मंत्री आश्विनी वैष्णव आणि दुरसंचार सचिव यांच्यात चर्चा झाली होती. या नेटवर्कच्या प्रसारासाठी डिसेंबरपर्यंत बीएसएनलचे सीमकार्ड मोफत वाटण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आलीये.
बीएसएनएल कंपनी भारतीय दुरसंचार उपकरण बनविण्यासाठी चंदीगडमध्ये टाटा कन्सलटन्सी सर्विसेज आणि राज्याकडून चालविण्यात आलेलं रिसर्च ऑर्गनायझेशनसोबत मिळून प्रुफ ऑफ कन्सेप्ट म्हणजेच पीओसी तयार करणार आहे. पीओसीचं मुख्य काम या बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये 4 जी उपकरण बसविणे, उपकरण बसवल्यानंतर त्यांची चाचणी करणेेेे, त्याला उपयोगात आणण्यासाठी काम करणे हे आहे.
टाटा कन्सलटन्सी सर्विसेज कंपनीने चंदीगडमध्ये 5 ठिकाणी हे उपकरण बसवले आहे. यासाठी दुरसंचारचे के. राजारमन, पी. के पुरवार, डॉ.राजकुमार उपाध्याय आणि टाटा कन्सलटन्सी सर्विसेज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून चंदीगडचा दौरा केला होता. आत्मनिर्भर भारत अंतर्गत देशातील सर्वच उपकरणं व सेवा या स्वदेशी करण्यावर भर दिला जात आहे. यासंदर्भात दुरसंचार मंत्री आश्विनी वैष्णव आणि दुरसंचार सचिव के. राजारमन यांच्यात रविवारी चर्चा झाली होती.
लवकरच बीएसएनएलचे 4जी नेटवर्क इतर नेटवर्कला स्पर्धा देताना दिसणार आहे. मात्र हे नेटवर्क पहिलं स्वदेशी 4जी नेटवर्क असणार आहे. भारतीय टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने बनवण्यात येणाऱ्या या नेटवर्कमुळे सरकारच्या आत्मनिर्भर भारत या धोरणाला गती मिळणार आहे. त्यामुळे या स्वदेशी सीमकार्डचा जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी हे सीमकार्ड काही दिवस मोफत वाटण्यात येणार असल्याची घोषणा बीएसएनएलने केली आहे.