कल्याण-डोंबिवलीत करोना प्रतिबंधाच्या नियमांचे उल्लंघन
डोंबिवली : करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कठोर र्निबध सुरू आहेत. पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जमावबंदी, संचारबंदीचे आदेश आहेत. या सगळ्या आदेशांकडे दुर्लक्ष करून कल्याण, डोंबिवलीतील अनेक रहिवासी डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा, गणेशनगर, मोठागाव, रेतीबंदर, ९० फुटी रस्ता, कल्याण पूर्वेत १०० फुटी रस्त्यांवर शतपावलीसाठी झुंडीने येत असल्याने प्रशासन, पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
हा सगळा परिसर खाडीकिनारा म्हणून प्रसिद्ध आहे. दररोज या ठिकाणी सकाळ-सायंकाळी रहिवाशांची गर्दी होऊ लागल्याने तिला रोखण्यासाठी पोलीस-प्रशासनाने विशेष पथके तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. कठोर र्निबधांमुळे रहिवाशांना घराबाहेर पडता येत नाही. असे असताना सायंकाळच्या वेळेत रहिवासी कुटुंबासह लहान मुलांना सोबतीला घेऊन डोंबिवलीत ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्ता, कांचनगाव खाडी किनारा, डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर, कुंभारखाणपाडा खाडी किनारा, मोठागाव रेतीबंदर, देवीचापाडा खाडी किनारी भागात दररोज सकाळ, संध्याकाळ फिरायला येतात. शतपावलीसाठी येणाऱ्या अनेक रहिवाशांच्या तोंडावर मुखपट्टी नसते, अशा तक्रारी आहेत. कल्याण पूर्वेत ड प्रभागाचे कार्यालय, १०० फुटी रस्त्यावरही रहिवासी फिरायला येतात.
बाजारातील गर्दीपेक्षा खाडीकिनारी, प्रशस्त रस्त्यांवर रहिवाशी अधिक संख्येने येऊ लागल्याने पालिका, पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी ही सगळी ठिकाणे गर्दीने फुलून गेली होती. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले या मौजमजेत सहभागी झाली होती. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाजारातील गर्दी हटविण्यासाठी पालिका, पोलीस पथके प्रयत्न करीत आहेत. महापालिका हद्दीतील करोना रुग्णसंख्या २०० च्या दरम्यान स्थिर आहे. रविवारी या गर्दीची माहिती मिळताच मोठागाव रेतीबंदर भागात विष्णुनगर पोलिसांनी धाव घेऊन फिरण्यासाठी आलेल्या रहिवाशांना घरचा रस्ता धरण्यास भाग पाडले.
मुखपट्टी न घालणाऱ्यांना दंड
रविवारी दिवसभरात पालिकेच्या पथकांनी १० प्रभागात मुखपट्टी टाळणाऱ्या २२४ पादचाऱ्यांकडून एक लाख १२ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पोलीस, वाहतूक पोलीस आणि पालिकेच्या तपासणी पथकांनी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागातील विविध तपासणी नाक्यांवर विनाकारण रस्त्यांवर वाहने फिरविणाऱ्या ५२० वाहनचालकांची प्रतिजन चाचणी केली. या चाचणीत दोन जण करोनाबाधित आढळून आले. त्यांची रवानगी पालिकेच्या करोना काळजी केंद्रात करण्यात आली. रामनगर पोलीस ठाण्यात रविवारी ३६ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तीन जण करोनाबाधित आढळले. कल्याणमध्ये महावीर सभागृहात २२५ जणांची करोना चाचणी करण्यात आली. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस, पालिका, वाहतूक पोलीस प्रतिजन चाचणीसह दंडात्मक कारवाई करीत असल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी झाली आहे.