डोंबिवलीतील रहिवाशांची पालिका आयुक्तांकडे तक्रार
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील राजाजी रस्त्यावरील एका रुग्णालयात परवानगी नसतानाही करोना रुग्णांवर उपचार होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. यासंबंधी या भागातील मानस सॉलिटिअर सोसायटीने संबंधित डॉक्टरची पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनीही संबंधित रुग्णालय चालकाला करोना रुग्णावर उपचार करण्याची परवानगी नसेल तर तात्काळ रुग्ण तेथून अन्य रुग्णालयात स्थलांतरित करा, असे सूचित केले. आयुक्तांकडून पत्र आपणास मिळाले की त्या पत्राच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्या. मानस सॉलिटिअर सोसायटीचे अध्यक्ष वास्तुविशारद चंद्रशेखर भोसले, सचिव प्रवीण दुधे यांनी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना ही तक्रार पाठविली आहे. या सोसायटीच्या पहिल्या माळ्यावर रुग्णालय आहे. रुग्णालय आणि सोसायटीतील सदस्यांना येण्या-जाण्यासाठी एकच रस्ता आहे. रुग्णालय चालकाने सोसायटीकडे दोन महिन्यांपूर्वी करोना रुग्णालय सुरू करण्यासाठी ना हरकत देण्याची मागणी केली होती. ती सोसायटीने रहिवाशांच्या आरोग्याचा विचार करुन नाकारली होती.
एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात या ठिकाणी करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने सदस्यांच्या निदर्शनास आले होते. महापालिका, पोलिसांच्या हा विषय निदर्शनास आणण्यात आला.
राजाजी रस्त्यावरील एका रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार केले जात असल्याची तक्रार आली आहे. या तक्रारीची खात्री करून संबंधित रुग्णालय चालकावर कारवाई केली जाईल.
– डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी