महापालिका प्रशासनाकडून टाळेबंदीचे निर्बंध शिथिल; मॉल, शॉपिंग सेंटरला मात्र परवानगी नाही
ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये करोना चाचण्यांमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्यामुळे प्रशासनाने मंगळवारपासून सर्वच आस्थापना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार अत्यावश्यक सेवेसह इतर एकल दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यानुसार शहरातील गोखले रोड, राम मारुती रोड तसेच इतर प्रमुख बाजारपेठातील दुकाने सुरू होणार आहेत. मात्र, मॉल आणि शॉपिंग सेंटरमधील दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही.
गर्दी टाळण्यासाठी शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार आहेत. तसेच दुपारी २ वाजेनंतर नागरिकांना विनाकारण फिरण्यास बंदी आहे. या नियमांचा दुकानदारांनी भंग केला तर, करोना साथ संपेपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात येतील. करोना चाचणीत दहा टक्के किंवा त्यापेक्षा कमी करोनाबाधितांचे प्रमाण तसेच प्राणवायूयुक्त खाटा ४० टक्क्यांपेक्षा कमी भरलेल्या असतील तर, निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार राज्य सरकारने महापालिकांना दिले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये दररोज सरासरी तीन ते साडेतीन हजार करोना चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये १४० ते १५० रुग्ण आढळून येत आहेत. एकूण चाचण्यांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण ७.८५ टक्के आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेऊन त्यासंबंधीचा आदेश सोमवारी काढला आहे.
दुपारी दोन वाजेनंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त ये-जा करण्यावर निर्बंध असणार आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार वस्तूंच्या घरपोच सेवेस परवानगी असणार आहे. करोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार आहेत. त्या ठिकाणी जास्तीच्या उपस्थितीची आवश्यकता असेल तर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. कृषीविषयक दुकाने आठवडय़ाच्या सर्व दिवशी म्हणजेच सोमवार ते रविवार सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सुरू राहणार आहेत. दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध असणार नाहीत.