ठाणे : मुंब्रा येथील ठाकूरपाडा भागात नाल्यामधील माती खचल्याने नाला आणि परिसरात बांधण्यात आलेल्या दोन इमारती आणि एक चाळ धोकादायक अवस्थेत झाल्या. येथील ५०० हून अधिक रहिवाशांना इमारतींमधून बाहेर काढून त्यांची लग्नसमारंभ सभागृह आणि महापालिकेच्या शाळेत तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली आहे.
ठाकूरपाडा येथे स्वस्तिक ही नऊ मजली, कोकण नगर ही पाच मजली इमारत आहे, तर जयराम भगत ही दुमजली चाळ आहे. या इमारतींचे आणि चाळींचे बांधकाम येथील नाल्यावर आणि नाल्यालगतच्या भागात करण्यात आले आहे. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रोशन शेख (३३) हे स्वस्तिक इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असताना प्रवेशद्वारासमोरील भागात नाल्यावर बनविण्यात आलेला काँक्रीटचा रस्ता अचानक खचला आणि शेख नाल्यात पडले. त्यांना नाल्यातून बाहेर काढण्यात आले. याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाला मिळाल्यानंतर महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक आणि महापालिका अभियंते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नाल्याशेजारी असलेल्या स्वस्तीक इमारतीतील ६९, कोकण नगरीमधील ६३ आणि जयराम चाळीतील सहा घरे रिकामी केली. ५०० हून अधिक रहिवासी या इमारती आणि चाळीत राहत होती. या सर्वाची मुंब्रा येथील महापालिका शाळा आणि एका खासगी लग्नसमारंभाच्या सभागृहात राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. पथकाने नाल्याची पाहणी केली असता नाल्यातील माती खचल्याचे समोर आले. या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.