ठाणे : राज्य सरकारने लागू केलेल्या र्निबधांमुळे उपाहारगृह मालक आणि व्यापाऱ्यांचा व्यवसाय डबघाईला येऊ लागला आहे. करोनाच्या र्निबधामुळे मुंबई, ठाण्यातील २५ ते ३० टक्के उपाहारगृहे अजूनही बंद आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. गेल्या काही वर्षांत नवउद्योजकांनी खाद्य व्यवसायात पदार्पण करत विविध खाद्यपदार्थाची वैशिष्टय़पूर्ण उपाहारगृहे सुरू केली. मात्र या व्यवसायात नव्याने संधी शोधणाऱ्या अनेकांना र्निबधांमुळे जमा-खर्चाचे गणित जमविताना अक्षरश: नाकीनऊ येऊ लागले असून काही व्यावसायिकांनी या व्यवसायातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती हॉटेल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
गेली दीड वर्षे करोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी आणि निर्बंध या कात्रीमध्ये सर्वच उपाहारगृह व्यावसायिकआणि व्यापारी अडकले आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमी वर राज्य शासनाने सर्वच दुकाने तसेच उपाहारगृहे सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. शनिवार आणि रविवार या दिवशी खरेदीसाठी किंवा बाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. या दिवशी दुकाने तसेच उपाहारगृहे बंद ठेवण्याची वेळ र्निबधांमुळे ओढावली आहे. सध्या करोना रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाही राज्य सरकारने संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे निर्बंध कायम ठेवल्याने व्यापारी वर्ग आणि उपाहारगृह चालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहक सायंकाळच्या वेळी येत असतात. सायंकाळी दुकाने बंद असल्यामुळे व्यवसाय कमी झाला आहे, असे काही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. नौपाडा येथील २०१७ मध्ये मनीष छाडवा यांनी शु व्हिला नावाने पादत्राणे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. मासिक सव्वा लाख रुपये भाडे आणि व्यवसायातील मंदी यांमुळे त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद केला आहे. त्यांच्या दुकानात असलेले पादत्राणे खराब झाली आहेत. माझ्या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नातून संपूर्ण घराचा कारभार चालत होता. करोनामुळे व्यवसाय बंद पडल्याने आता, नोकरी शोधून घर चालवणार असल्याचे मनीष यांनी सांगितले. उपाहारगृह चालकांनाही सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हॉटेल खुली ठेवण्यास परवानगी दिली असून, या वेळेत केवळ १० ते १५ टक्केच व्यवसाय होत असल्याचे काही उपाहारगृह चालकांकडून सांगण्यात आले. सायंकाळी ४ वाजेनंतर घरपोच सेवा देण्यास मुभा असली तरी अशा पद्धतीच्या व्यवसायास मर्यादा आहेत. व्यवसाय कमी होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, जागेचे भाडे तसेच इतर खर्चाचे गणित करताना उपाहारगृह चालक पेचात अडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्यवसाय होत नसल्यामुळे मुंबई, ठाण्यातील २५ ते ३० टक्के उपाहारगृह चालकांनी आपले हॉटेल बंद ठेवली आहेत, असे काही उपाहारगृह मालकांचे म्हणणे आहे.
करोना निर्बधांमुळे वस्तूची विक्री करण्यावर वेळ मर्यादा आल्याने व्यापारी वर्गाला याचा ५० टक्के फटका बसला आहे. ग्राहक सायंकाळच्या वेळी खरेदी करण्यासाठी मोठय़ासंख्येने येत असतात, परंतु यावेळेतच दुकाने बंद ठेवावी लागत आहेत.