|| पूर्वा साडविलकरगेल्या वर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के अधिक मागणीठाणे : गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावामुळे अनेकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करण्यास प्राधान्य दिले होते. यासाठी अनेकांनी पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना केली होती. यंदाही करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या मूर्तींच्या मागणीत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती गणेशमूर्तिकारांनी दिली.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी राज्य शासनाने पर्यावरणपूरक मूर्तींची स्थापना करावी आणि मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे, असे आवाहन जनतेला केले होते. जेणेकरून विसर्जनाच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही. यामुळे गेल्यावर्षी अनेकांनी शाडूमातीच्या मूर्तीची स्थापना केलेली पाहायला मिळाली. दरवर्षी मुंबईसह, ठाणे जिल्ह्यात रायगड, पेण तर काही प्रमाणात पुण्याहून गणेशमूर्ती विक्रीसाठी येत असतात. पेणहून जवळजवळ १०० टक्के मूर्ती ठाणे जिल्ह्यात विक्रीसाठी दाखल होत असतात. यंदा आतापर्यंत ७५ टक्के मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या असून यामध्ये २५ टक्के शाडू माती तर, ५० टक्के प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचा समावेश आहे, अशी माहिती पेणमधील गणेशमूर्ती कारखानदार आशीष मांडलेकर यांनी दिली.
करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक मूर्तींची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून गणेशमूर्तींचे विसर्जन हे घरच्या घरी करण्यास ते प्राधान्य देणार आहेत. यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनाही सरकारने चार फूट मूर्तीची स्थापना करण्याची मर्यादा घालून दिल्याने अनेक मंडळानी यंदा शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करण्याचे ठरविले आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची २५ ते ३० टक्क्यांनी मागणी वाढली आहे, अशी माहिती पुण्यातील पर्यावरणपूरक मूर्तिकार नरेश नागपुरे यांनी दिली.
इंधन दरवाढीचा फटका
इंधन दरवाढीचा परिणाम, यंदा शाडू माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरही झालेला पाहायला मिळत आहे. मूर्तींच्या किमतीत १ फुटामागे ५० ते १०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या शाडू मातीची १ फुटाची मूर्ती ७०० रुपयांना तर, पीओपीची मूर्ती ४५० रुपयांना विक्रीसाठी दाखल झाली आहे, अशी माहिती पेणमधील गणेशमूर्ती कारखानदार आशीष मांडलेकर यांनी दिली.
‘पीओपी’च्या मूर्तींनाही मागणी
करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी अनेकांनी पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना केली होती. यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींच्या मागणीत घट झालेली पाहायला मिळाली होती. मात्र, त्यावेळी अनेकांना पर्यावरणपूरक मूर्ती हाताळण्यास अवघड झाले होते. त्यापैकी काहींनी यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकारच्या मूर्तींनाही मागणी आहे, असे ठाण्यातील गणेशमूर्ती विक्रेते राकेश मोरे यांनी सांगितले.