ठाणे : मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर पडलेला खड्डा बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्यापही पूर्ण करणे शक्य न झाल्याने या मार्गावरील वाहतूक बदल १४ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे नवी मुंबई, ठाणे, कळवा, विटावा भागात आणखी चार दिवस वाहतूक कोंडी कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर २९ जुलैला खड्डा पडला. त्यामुळे ठाणे पोलिसांनी ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक महापे मार्गे कोपरखैरणे पूल, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर आणि कोपरी मार्गे ठाणे शहरात वळविली आहे. मात्र, कोपरी पूल अरुंद असल्याने या मार्गावर दररोज वाहतूक कोंडी होते. तर टोल टाळण्यासाठी काही वाहनचालक पटणी मार्गे विटावा, कळवा येथून जात आहेत. त्यामुळे या मार्गावरही वाहतूक कोंडी आहे. खड्डा बुजवण्याचे काम आता १४ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे.
खड्डे बुजवण्याबाबत चालढकल
मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरील रेतीबंदर भागात २९ जुलैला मोठा खड्डा पडला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डेही बुजविण्याचे काम हाती घेतले. खड्डे बुजविण्यासाठी ३१ जुलै पर्यंत वाहतूक बदल लागू करण्यात आले. मात्र, हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले नाही. त्यामुळे ४ ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल करण्यात आले. ४ ऑगस्टलापर्यंतही खड्डे बुजविले गेले नसल्याने ९ ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल लागू करण्यात आले. मात्र, ९ ऑगस्टलाही खड्डे बुजविण्याचे पूर्ण झाले नसल्याने आता १४ ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल कायम ठेवण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे.