ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अंतर्गत मार्गावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले असले तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच असल्याने महापालिकेचा हा खड्डेभरणा कार्यक्रम दिखाऊपणा ठरण्याची शक्यता अधिक आहे. सिमेंट, रेतीचे मिश्रण हे खड्डे बुजविण्यासाठी वापरात आणले जात असले तरी अजूनही शहरातील सेवा रस्ते, मुख्य अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे कायम असल्यामुळे ठाणेकरांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत मार्गावरही खड्डे पडल्याने वाहने चालविताना जीव मुठीत घेऊन चालकांना ये-जा करावी लागते. माजिवडा, कापूरबावडी, नौपाडा, गोखले रोड आणि वागळे इस्टेट भागात रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे दररोज ठाणेकरांना खड्डे आणि वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागत आहे.
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या मीनाताई ठाकरे उड्डाणपूल, तीन पेट्रोल पंप आणि नौपाडा येथील संत नामदेव चौकातील उड्डाणपुलांवरही खड्डे पडले आहेत. या उड्डाणपुलांच्या उभारणीमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरली कोंडी दूर होईल, असे दावे केले जात होते. प्रत्यक्षात काही ठिकाणी अत्यंत निमुळत्या असलेल्या या उड्डाणपुलांमुळे वाहनकोंडी दूर होण्याऐवजी अनेक ठिकाणी ‘बॉटल नेक’ तयार झाले आहेत. दरम्यान, ठाणे महापालिकेने या तिन्ही उड्डाणपुलांवर तात्पुरती खड्डेदुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील खड्डे महापालिकेकडून बुजविले जातात. मात्र, पाऊस पडल्यानंतर बुजविलेले खड्डे पुन्हा उखडतात. सर्वसामान्य नागरिक कर भरत असतानाही त्यांना चांगले रस्ते मिळत नाहीत.