बदलापूर : महिनाभरापूर्वी १९ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या २४ तासांत २० दशलक्ष घनमीटरचा पाणी साठा झालेल्या बारवी धरणात त्यानंतर मात्र धरण भरण्याचा वेग मंदावला आहे. गेल्या महिनाभरात बारवी धरणात फक्त १२० दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा झाला असून बारवी धरण ८५ टक्के भरले आहे. सध्याच्या घडीला बारवी धरणात २८९.३८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. गेल्या काही दिवसात पावसाचा वेग मंदावल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात झालेल्या विक्रमी पावसामुळे ठाणे जिल्ह्य़ातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात वेगाने जलसंचयन होत होते. जुलै महिन्यात १९ ते २० जुलै या २४ तासांच्या काळात २०.८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमल्याची नोंद झाली. त्यामुळे २० जुलै रोजी धरणात १८२.५० दशलक्ष लिटर पाणीसाठा होता, तर त्यानंतर दहा दिवसांत बारवी धरणात ८४.४३ दशलक्ष घनमीटर पाण्याची भर पडली होती. या दहा दिवसांत झालेल्या पावसामुळे बारवी धरणाने ६९.०२ मीटर पाणी पातळी गाठली होती. मात्र गेल्या काही आठवडय़ांपासून पावसाची रिमझिम असली तरी पावसाचा जोर ओसरल्याने अजूनही बारवी धरण आपल्या पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. महिनाभरापूर्वी ५० टक्के भरलेले धरण १९ ऑगस्ट रोजी ८५.४० टक्के भरले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास आणखी काळ वाट पाहावी लागेल, अशी शक्यता आहे.
भातसा, आंध्रा धरणक्षेत्रातही पाऊस ओसरला
शहापूर तालुक्यातील भातसा धरण आपल्या क्षमतेच्या ८६.३६ टक्के भरले आहे. सध्याच्या घडीला धरणात ८१३.६० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून धरणाची एकूण क्षमता ९४२.१० दशलक्ष घनमीटर आहे. आंध्रा धरण ६७.१३ टक्के भरले आहे. धरणात सध्याच्या घडीला २२७.६५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. धरणाची एकूण पाणीक्षमता ३३९.१४ आहे.
२४ तासांत धरणक्षेत्र कोरडेच
गेल्या २४ तासांत बारवी धरण क्षेत्रात अवघा ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून १९ ऑगस्टपर्यंत बारवी धरण क्षेत्रात १,७८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक असले तरी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास आणखी वेळ लागणार आहे.