ठाणे : वेठबिगारी ही अमानुष प्रथा आजही जिवंत असल्याची प्रचीती देणारा प्रकार मुंबईपासून हाकेच्या अंतरावर उजेडात आला आहे. भिवंडी तालुक्यातील एका गावातून १८ आदिवासींची वेठबिगारीतून मुक्तता करण्यात आली. त्यांत पुरुष, महिला आणि मुलांचाही समावेश आहे. जमीनदार वेठबिगार मुले आणि महिलांवर अत्याचारही करीत होता.
भिवंडी तालुक्यातील पिलंझे (चिंचपाडा) येथे १८ जणांना स्थानिक जमीनदाराने वेठबिगार बनवले होते. त्यातील महिला, बालकांवर अत्याचार केले जात होते, तर पुरुषांना मारहाण, शिवीगाळ करून त्यांना राबवण्यात येत होते. श्रमजीवी संघटनेने तक्रार केल्यानंतर अखेर कातकरी समाजातील १८ जणांना वेठबिगारीतून मुक्त करण्यात आले. महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी जमीनदार राजा काथोड पाटील याच्याविरुद्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिलंझे गावातील कातकरी वाडीतील आदिवासी तीन दशकांपासून पिढ्यान्पिढ्या जमीनदार राजाराम पाटील (राजा काथोड पाटील) आणि चंद्रकांत पाटील यांच्या घरी विविध प्रकारची कामे करत होते. वीटभट्टी, शेती आणि दगडखाणीच्या कामासाठी येथील कातकरी नागरिकांना राबवून घेतले जात होते. काम नाकारल्यास किंवा इतरांकडे कामाला गेल्यास त्यांना शिवीगाळ, मारहाण करण्यात येत होती. मारहाणीतून महिलाही सुटत नव्हत्या. महिलांचा उपमर्द, विनयभंग आणि त्यांच्यावर अत्याचारही केले जात होते. वर्षानुवर्षे हा कष्टकरी समाज जमीनदाराचे अत्याचार सहन करीत होता.
श्रमजीवी संघटनेला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आदिवासी क्षेत्र विकास समितीच्या माध्यमातून विवेक पंडित यांनी १ जुलै रोजी या कातकरी पाड्याला भेट दिली. त्यानंतर वर्षानुवर्षे सुरू असलेला हा गंभीर प्रकार प्रकाशझोतात आला. जमीनदारांविरुद्ध कारवाई सुरू झाली. गुरुवारी भिवंडीचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार अधिक पाटील यांनी १८ आदिवासींना वेठबिगारीतून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र दिले. या १८ नागरिकांमध्ये पाच महिलांसह ७० वर्षीय वृद्धांचाही समावेश आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होतअसताना केवळ दूरगामी भागांतच नाही तर मुंबई महानगरापासून काही अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यात आदिवासींना वेठबिगार म्हणून राबवून त्यांचे मानवी हक्क पायदळी तुडवण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे. मुरबाड तालुक्यातील मिल्हे गावात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींना वेठीस धरल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. त्यापाठोपाठ आता भिवंडी तालुक्यात वेठबिगारीचा प्रकार उजेडात आला आहे.
वेठबिगारीबाबत लवकरच याचिका : विवेक पंडित
पालघर : जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या वेठबिगारीची अनिष्ट प्रथा समूळ नष्ट करण्यात पालघर जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप आदिवासी क्षेत्र विकास समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केला आहे. आपण या प्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. भिवंडी तालुक्यात उघडकीस आलेल्या वेठबिगारांच्या प्रकारात पालघर जिल्ह्यासह ठाणे, रायगड आणि नाशिक येथील ४३ पेक्षा अधिक मजुरांचा समावेश आहे. अन्य एका वेठबिगाराचा मृत्यू झाल्याची माहिती विवेक पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एकाच मालकाविरुद्ध अत्याचार, छळ, भ्रष्टाचार असे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. हा अपवादात्मक प्रकार आहे. १९८२पासून वेठबिगार मुक्तीसाठी प्रयत्न सुरू असतानाही असे प्रकार घडतात, हे आमच्या चळवळीचेही अपयश आहे. – विवेक पंडित, आदिवासी क्षेत्र विकास समिती
जमीनदाराविरुद्ध गुन्हे
महिला आणि बालकांवर अत्याचार केल्याप्रकरणी ‘अॅट्रॉसिटी’ कायद्यानुसार जमीनदार राजा काथोड पाटील याच्याविरुद्ध भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कामाच्या निमित्ताने अल्पवयीन मुली आणि महिलांवर अत्याचार केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.
श्रमजीवी संघटनेच्या तक्रारीनंतर या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली. जमीनदार आदिवासींना अनेकदा मारहाण, शिवीगाळ करीत असल्याची तक्रार होती. त्यांना मुक्त केले आहे. आता त्यांना स्वतंत्रपणे कुठेही काम करता येईल, शासकीय योजनांचाही लाभ घेता येईल. – अधिक पाटील, तहसीलदार, भिवंडी