किशोर कोकणेकरोना प्रादुर्भावाच्या भीतीने येत्या मंगळवारी असलेल्या गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली असल्याने ठाण्यातील मोठय़ा विशेषत: शिवसेनेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दहीहंडय़ा यंदा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, मनसेने हा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करत दहीहंडी उत्सवादरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवादरम्यान ठाण्यात आयोजक विरुद्ध पोलीस असा संघर्ष वाजण्याची चिन्हे आहेत.
ठाणे हे दहीहंडी उत्सवाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक मंडळांखेरीज राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून मोठय़ा प्रमाणात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच येथे बक्षिसांची लयलूटही मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे ठाणे जिल्हाच नव्हे तर मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यातील गोविंदा पथके गोपाळकाल्याच्या दिवशी ठाण्यात फिरताना दिसतात. मात्र, करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला. यंदाही करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता विचारात घेऊन राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाच्या आयोजनास परवानगी नाकारली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांमार्फत आयोजित केले जाणारे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले. मात्र, मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून नियम पाळून हा उत्सव साजरा करणार असल्याचा दावा केला आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे उभारले जातात. या थरांमधील व्यक्ती एकमेकांना चिकटून उभ्या असतात आणि त्यांना मुखपट्टी घालून थर उभारणे शक्य नाही. यामुळे नियमाच्या चौकटीत राहून हा उत्सव कसा साजरा होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. करोना प्रतिबंधक लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या व्यक्तींनाच दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची मागणी होत आहे. परंतु दहीहंडी उत्सवात तिसऱ्या थराच्या वरती १८ वर्षांच्या आतील मुलांचे थर रचले जातात. सद्य:स्थितीत या वयोगटाचे लसीकरण झालेले नाही. यातून करोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
राज्य सरकारच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे पोलिसांनीही आतापासूनच खबरदारी घेत विविध पोलीस ठाण्यांमध्ये गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यास गोविंदा पथकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच आयोजकांनाही दहीहंडीची परवानगी नसल्याने त्यांनाही नियमांचे उल्लंघन टाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्यास अशा आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
दहीहंडीऐवजी आरोग्य उत्सव
ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानने यंदा दहीहंडी उत्सव रद्द करून त्याऐवजी महाआरोग्य उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवामध्ये रुग्णवाहिका, मोक्षरथ, कर्करोग निदान वाहन, रक्तदान वाहन अशा ११ वाहनांचे तसेच प्राणवायू प्रकल्पाचे लोकार्पण मंगळवारी करण्यात येणार आहे, अशी माहिती ओवळा-माजिवाडा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आयोजक आणि गोविंदा पथकांनी राज्य सरकारच्या नियमांचे पालन करावे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल केला जाईल. करोनाचा प्रसार रोखणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.
-जयजीत सिंह, आयुक्त, ठाणे पोलीस
करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने दहीहंडीची परवानगी नाकारणे स्वागतार्ह आहे. नागरिकांनीही जबाबदारी ओळखून उत्सव साधेपणाने साजरे करावेत.
– डॉ. महेश बेडेकर, सामाजिक कार्यकर्ते.
‘नागरिकांच्या जीवापेक्षा उत्सव महत्त्वाचा नाही. एक वर्ष उत्सव साजरा केला नाही तर, काही फरक पडणार नाही. त्यामुळे ठाण्यात शिवसेनेमार्फत होणाऱ्या दहीहंडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य पक्षांनीही हा उत्सव रद्द करावा.’
– प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना