ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात दिवसेंदिवस करोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असतानाच, एकीकडे करोना चाचण्यांच्या संख्येतही घट झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सद्य:स्थितीला करोनाबाधित होण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण घटले असल्याचा दावा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. सध्या करोनाबाधित आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या तसेच लक्षणे असलेल्या व्यक्तींच्याच करोना चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली असून टाळेबंदीच्या नियमांमध्ये शासनाने शिथिलता आणली आहे. ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्य़ातील सर्वच शहरांमध्ये रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्य़ात करोना प्रादुर्भाव कमी झाला असून सद्य:स्थितीला दिवसाला २०० ते २५० रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांच्या नातेवाईकांची तसेच ज्यांना लक्षण आहेत असे नागरिक सध्या करोना चाचणी केंद्रावर चाचणी करण्यासाठी येत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण या क्षेत्रातील खासगी आणि शासकीय केंद्रांवर करोना चाचण्या करण्यात येतात. जिल्ह्य़ात जून आणि जुलै महिन्यामध्ये १५ ते २० हजार नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात येत होत्या. त्यामध्ये ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. तर, ऑगस्ट महिन्यात पाच ते दहा हजार नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात येत असून त्यामध्ये १५० ते २५० करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. करोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे चाचणीसाठी केंद्रांवर येणाऱ्यांची संख्या घटली आहे. यामुळे जिल्ह्य़ातील खासगी तसेच शासकीय असे काही करोना चाचणी केंद्रे बंद झालेले दिसून येत आहे. असे असले तरी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि नवी मुंबई शहरात अधिक प्रमाणात चाचण्या होत असल्याचे पाहायला मिळत आहे.