डोंबिवली : डोंबिवली आणि ठाकुर्ली स्थानकादरम्यान डाऊन दिशेच्या मार्गिकेवरील रुळांवर गुरुवारी सायंकाळी दगड ठेवल्याचा प्रकार समोर आला. या मार्गावरून जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्याने वेळीच गाडी थांबवून लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरू असलेल्या तपासात एका अल्पवयीन मुलाने खोडसाळपणा म्हणून हे दगड ठेवल्याचे समोर आले.
सायंकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी डोंबिवलीवरून कल्याणकडे जाणारी लोकलगाडी ठाकुर्ली स्थानकात जाण्यापूर्वी मोटरमनला रुळांवर काही दगड ठेवल्याचे दिसले. त्यांनी त्वरित गाडी थांबवून याची माहिती लोहमार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. त्यावेळी खांब क्रमांक ४८/७० जवळ हे दगड आढळले. मोटरमनच्या दक्षतेमुळे या ठिकाणी मोठा अपघात टळला. डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याच्या आरोपाखाली अज्ञातांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी लोहमार्ग पोलीस तपास करत असताना गुप्त माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आपण खोडसाळपणातून हा दगड रेल्वे रुळावर ठेवल्याचे या मुलाने सांगितल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.