पालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप आक्रमक
ठाणे : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेनेचा आत्मा मुंबई, ठाण्यात आहे. आगामी निवडणुकीत या दोन्ही पालिकांमधील सत्ता शिवसेनेकडून हिरावून घेणे, हेच भाजपचे मुख्य लक्ष्य असेल, असा स्पष्ट संदेश भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी रविवारी ठाण्यातील बैठकीत दिला. यामुळे पालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार संघर्षांचे संकेत आहेत.
पुढील वर्षी होणाऱ्या ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्य प्रभारी, तसेच सरचिटणीस सी. टी. रवी यांनी रविवारी टिप टॉप प्लाझा येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी पक्षाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, ठाणे प्रभारी आशिष शेलार, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पाच वर्षांपूर्वी झालेली पालिकेची निवडणूक भाजपने फारशी आक्रमकपणे लढवली नसल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत मुंबई आणि ठाण्यात शिवसेना हेच आपले लक्ष्य असेल आणि या दोन शहरांमधून शिवसेनेचा पराभव झाल्यास महाविकास आघाडी सरकारचा तसेच शिवसेनेचा आत्मा हिरावून घेतल्यासारखे होईल, अशी भूमिका यावेळी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मांडली. ठाण्यात शिवसेनेची पाळेमुळे खोलवर रुजली असली तरी, महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून पक्षाला आणि नेत्यांना सळो की पळो करता येऊ शकेल, अशी चर्चाही बैठकीत झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मुंबई पालिकेसाठीही भाजपकडून आक्रमक रणनीती आखण्यात येत आहे.
भाजप हा शिवसेनेशी संघर्ष करण्यासाठी नव्हे तर, देशविरोधी विचारांच्या विरोधात आहे. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांपासून खूप दूर गेली आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे, असे भाजपचे राज्य प्रभारी सी. टी. रवी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भाजप देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे, असे सांगत त्यांनी शिवसेना- भाजप युतीबाबत भाष्य करणे टाळले.
मनसेशी युती नाही
काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक झाली होती. या बैठकीमुळे आगामी पालिका निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र, मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच इतर कोणत्याही पक्षाशी युती होणार नसून स्वबळावरच निवडणूक लढवली जाणार असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.