ठाणे, 1 सप्टेंबर : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (TMC officer Kalpita Pimple) यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भेट घेतली. ठाण्यातील (Thane) खासगी रुग्णालयात राज ठाकरेंनी भेट देत कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही भेट घेत राज ठाकरेंनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.तब्येतीची काळजी घ्या, लवकर बऱ्या व्हा, फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे मनपाच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्याने सोमवारी सायंकाळी हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे छाटली गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फेरीवाल्याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.राज ठाकरेंनी व्यक्त केला होता संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत या घटनेवर संताप व्यक्त करत म्हटलं होतं, पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सगळी बोटं छाटली जातील आणि यांना फेरिवाला म्हणून फिरता येणार नाही ना त्या दिवशी यांना कळेल. हिंमत कशी होते यांची.निषेध करुन ही लोक सुधरणारी नाहीयेत. आम्ही हे वारंवार सांगत होतो. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. महाराष्ट्रातील शासकीय अधिकाऱ्याची बोट छाटली जातात?आज पकडले गेलेत उद्या जामीन होईल आणि परत हे बाहेर दुसऱ्यांची बोट तोडायला. कल्पिता पिंपळे या ठाणे महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे आणि त्यांचा सुरक्षा रक्षक पालवे या दोघांना ठाण्यातील जुपीटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ठाणे मनपाची टीम अनधिकृत फेरिवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी दाखल झाली त्यावेळी फेरीवाल्याने धारदार शस्त्राने साय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी अमरजित यादव या भाजी विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे तीन वर्षांपूर्वी याच अमरजित यादव याच्यावर हल्ल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.