ठाणे / मुंबई / नवी मुंबई : पावसाने धरलेला जोर, रस्त्यांवरील खड्डे आणि कोकणाच्या दिशेने निघालेल्या गणेशभक्तांच्या गाडय़ा, यामुळे बुधवारी रात्री मुंबई महानगर क्षेत्रात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे मंगळवारप्रमाणेच बुधवारीही कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले, तर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांपुढे प्रवासाच्या सुरूवातीलाच कोंडीचे विघ्न उभे ठाकले.
मुंबई-नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गावर भीषण कोंडी झाली. वाहन चालकांना अध्र्या तासाचे अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तास लागत होते. रात्री ९.३० नंतरही वाहतूक कोंडी कायम राहिल्यामुळे या मार्गावरून कामावरून उपनगरांत परतणाऱ्या नागरिकांचे हाल झाले.
मुंबईत मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर होता. त्यामुळे शहरांतील विविध भागांत बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले. त्याचा परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला.
मुंबईतून ठाण्याकडे..
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका ते कोपरी पुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर दोन वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. त्यामुळे मुंबईतून ठाणे, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. अध्र्या तासाचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना दोन ते अडीच तास लागत होते. तसेच भिवंडीहून मुंबई, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरही खारेगाव टोलनाका ते भिवंडी येथील िपपळनेपर्यंत ही वाहतूक कोंडी होती.
गणेशभक्तांची वाहनगर्दी..
गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने निघालेल्या गणेशभक्तांच्या वाहनांची मोठी गर्दी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अन्य शहरांत बुधवारी दिसत होती. एसटीच्या जादा गाडय़ांबरोबरच खासगी वाहनांची संख्या वाढल्याने मंगळवारी रात्रीपासूनच बेलापूर, कळंबोली, पनवेल पट्टय़ापर्यंत प्रचंड कोंडी झाली होती. बुधवारी त्यात आणखी भर पडल्याने वाहतूक नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसत होते.
ठाणे-बेलापूर मार्ग..
मुंब्रा बाह्यवळण मार्गावरही जड वाहनांच्या भारामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तसेच ठाणे-बेलापूर मार्गावरही वाहतुकीचा वेग मंदावला होता. येथील विटावा ते कळवा पुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नवी मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या वाहन चालकांचे हाल झाले. सर्वच मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक पोलिसांनाही वाहतूक कोंडी सोडविताना नाकीनऊ आले होते. रात्री ९.३० नंतरही शहरात वाहतूक कोंडी कायम होती.