कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेने स्वत:च्या मालकीच्या आरक्षित भूखंडावर विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय अठरा वर्षांपूर्वी घेतला होता. ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ तत्त्वावर सात विकास प्रकल्प राबविण्यात येणार होते. कल्याण पश्चिमेतील दुर्गामाता चौकात वाहनतळ संकुल (पार्किंग प्लाझा) उभारण्याचे काम मे. एस. एम. असोसिएटएस या मुंबईतील बांधकाम कंपनीला दिले होते.
नावातील साधम्र्याचा गैरफायदा घेऊन या कंपनीच्या भागीदाराने कल्याण डोंबिवली पालिकेची जागा भाडे, त्यावरील व्याज अशी २० कोटी ६९ लाख रुपये पालिकेला न देऊन आर्थिक फसवणूक केली आहे. कंपनीच्या तीन भागीदारांविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. १०) गुन्हा दाखल करण्यात आला.
कल्याण डोंबिवली पालिकेचे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांनी संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ६ जुलै २००५ ते ९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. मे. एस. एम. असोसिएटएस भागीदार कंपनीचे संचालक मॅथ्यू जॉन कुचिन, अनिल चंदुलाल शह, सीमा अनिल शहा अशी आरोपींची नावे आहेत.
अभियंता जुनेजा यांनी तक्रारीत म्हटले आहे, महाराष्ट्र शासन आणि कल्याण डोंबिवली पालिकेने शहर विकास आणि सामान्य रहिवाशांच्या व्यापक हितामधून मे. एस. एम. असोसिएटस भागीदार संस्था क्रमांक बीए-६२३७६ यांनी पालिकेने मंजूर केलेले काम विहित वेळेत पूर्ण केले नाही. त्यामुळे प्रकल्प रखडला. तसेच, मे. एस.एम. असोसिएटस, भागीदार संस्था क्रमांक बीए- १०२७२३, या दोन्ही भागीदार संस्थांनी नावातील सारखेपणाचा गैरफायदा घेऊन कल्याण डोंबिवली पालिकेची फसवणूक केली.