तात्पुरती मलमपट्टी उखडल्याने पुन्हा खड्डे; वाहतूक कोंडीला नवे निमित्त
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवार दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे तात्पुरता मुलामा लावून बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले. त्यामुळे बुधवारी सकाळपासून ठाणे शहरातील विविध भागांत पुन्हा वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत पूल ते माजिवडा आणि भिवंडीतील माणकोली नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अवजड वाहनांच्या बंदीमुळे वाहतूक कोंडीतून ठाणेकरांना दिलासा मिळेल असे वाटले होते. बुधवारी उखडलेल्या खड्डय़ांमुळे पुन्हा ठाणेकरांचे हाल झाले. दुपारी १ नंतरही वाहतूक कोंडी कायम होती.
गेल्या काही दिवसांपासून शहरात खड्डय़ांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी शुक्रवार आणि शनिवारी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यानंतर ठाणे शहरातील मुख्य मार्गावर प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. तसेच अवजड वाहनांनाही दिवसा शहरात प्रवेशबंदी करण्यात आली. यानंतर ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी आशा होती. मात्र मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे तात्पुरता मुलामा देऊन बुजविण्यात आलेले शहरातील खड्डे पुन्हा उखडले. त्याचा परिणाम बुधवारी शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झाला. मुंबई-नाशिक महामार्गावर साकेत पुलावर खड्डे पडल्याने ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर साकेत पूल ते माजिवडा आणि नाशिकहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर साकेत पूल ते माणकोली पुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली. अवघे १० मिनिटांचे अंतर पार करण्यास वाहनचालकांना एक तास लागत होता. या मार्गावर रस्त्याकडेला राडारोडा असल्याने अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत होती. ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने काही ट्रक आणि टेम्पोचालक कळवामार्गे ठाण्याच्या दिशेने येत होते. त्यामुळे कळवा पूल, कोर्ट नाका भागातही वाहतूक कोंडी झाली होती.
भिवंडी येथील कशेळीमार्गे नारपोली भागातही खड्डय़ांचे साम्राज्य आहे. या खड्डय़ांमध्ये गुडघाभर पाणी साचत होते. त्यामुळे अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या मार्गावरही कशेळी ते कल्याण नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या भागात अद्यापही खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
खड्डय़ांतील रेती वाहून गेली
दोन दिवसांपूर्वी वागळे इस्टेट, तीन हात नाका, यशोधननगर, ज्ञानेश्वरनगर भागात महापालिकेकडून खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र पुन्हा या भागात पुन्हा खड्डे पडले आहेत. खड्डय़ांमध्ये भरण्यात आलेली रेती वाहून गेली आहे. त्यामुळे अंतर्गत मार्गावरही वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळाले.