गुजरातमधून येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी, वाहनतळांचा शोध
ठाणे/पनवेल/पालघर : ठाणे-नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील प्रमुख रस्त्यांवर सध्या होत असलेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या पट्टय़ातील अवजड वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गुजरातमधून पालघर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर निर्बंध करण्याबरोबरच दिवसा अवजड वाहने उभी करण्यासाठी वाहनतळांच्या जागेची शोधाशोध सुरू करण्यात आली आहे.
रस्त्यावरील खड्डे, अपघात आणि रस्त्याकडेला उभी केली जाणारी अवजड वाहने यामुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी जिल्ह्य़ात चार ठिकाणी अवजड वाहनांसाठी वाहनतळाची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी सोमवारी घेतला. या निर्णयानुसार त्यांनी बुधवारी वाहनतळाच्या जागानिश्चितीसाठी उरण, खारेगाव, दापोडे, उरण, भिवंडी या भागांचा दौरा केला. त्यानंतर जेएनपीटीच्या सीएफएस केंद्रातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना विविध रंगांचे स्टिकर लावण्याचा आणि त्यांचे सिडको, जेएनपीटी आणि नवी मुंबई आणि रायगड पोलीस यांच्या माध्यमातून नियमन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या वाहनांच्या रहदारीस रात्री ११ ते ६ या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दररोज सात ते आठ हजार अवजड वाहनांची वाहतूक होत असते. तरीही यापैकी अनेक गाडय़ा भिवंडी, वसई- विरार महानगरपालिका क्षेत्र तसेच बोईसर- पालघर येथील औद्योगिक क्षेत्रात मालवाहतूक करत असतात. या वाहनांच्या प्रवेशावर कोणतीही र्निबध न ठेवता ठाणे, जेएनपीटी भागाकडे जाणाऱ्या उर्वरित वाहनांना सीमावर्ती भागाचा प्रवेश विशिष्ट वेळेत देण्याची योजना आखली जात आहे. या नवीन आराखडय़ात ठाणे- मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना दापचरी येथे रोखण्यात येईल.