सोमवारपासून आठवी ते बारावी वर्ग भरणार; स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नियमावली जारी
ठाणे, नवी मुंबई, पालघर : मार्च २०२०पासून बंद ठेवण्यात आलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर पट्टय़ातील शाळांमध्ये सोमवारपासून आठवी ते बारावीचे वर्ग भरण्यास सुरुवात होत आहे. ठाणे, पालघर जिल्ह्य़ांतील ग्रामीण भागातील काही शाळा आधीच सुरू झाल्या असल्या तरी, सोमवारपासून शहरी भागांतील शाळांमध्येही गजबज पाहायला मिळणार आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाने आखून दिलेल्या नियमावलीच्या आधारे विविध पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शाळा व्यवस्थापनांनी तयारीही सुरू केली आहे. मात्र, अजूनही असंख्य पालकांमध्ये मुलांना शाळेत पाठवण्याबाबत धास्ती आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून करोनाचा संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने तसेच करोना प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढल्यामुळे राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून आठवी ते बारावी इयत्तांचे वर्ग प्रत्यक्षपणे भरवण्यास परवानगी दिली आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. या निर्णयाला अनुसरून मुंबईसह ठाणे आणि पालघरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिली.
नियमावलीनुसार शाळा व्यवस्थापनांनी वर्ग भरवण्याची तयारी सुरू केली असली तरी, अद्याप सरसकट सर्वच शाळांची यासंदर्भात तयारी पूर्ण झालेली नाही. अनेक शाळांनी सुरुवातीला सावध पवित्रा घेतला असून कमी वेळेसाठी वर्ग भरवण्याचा तसेच ऑनलाइन शिक्षणही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील रा. ज. ठाकूर विद्यामंदिर शाळेने सुरुवातीच्या आठवडाभर दोनच तास वर्ग भरवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे. एका वर्गात एक बाक सोडून २१ विद्यार्थ्यांना बसवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि दोन मुखपट्टय़ा आणणे सक्तीचे केले आहे,’ असे मुख्याध्यापक डी. आर. पाटील यांनी सांगितले. अशाच प्रकारे अन्य शाळांनी पटसंख्येनुसार विद्यार्थ्यांची विभागणी करून शाळा सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
एकीकडे शाळा आणि प्रशासन यांनी तयारी सुरू केली असली तरी, पालकांमध्ये अजूनही मुलांना शाळेत पाठवण्याबाबत चलबिचल आहे. करोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी, एकही लस न दिलेल्या पाल्याला शाळेत पाठवायचे कसे, असा प्रश्न अनेक पालकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना उपस्थित केला. दुसरीकडे, ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा आणि प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याची गरज याबाबत अनेक पालक आग्रहीदेखील आहेत. ‘ऑनलाइन पद्धतीमुळे शिक्षणात व्यत्यय येत आहे. त्यामुळे शाळा सुरू होणे गरजेचेच आहे’, असे मत दीक्षा कदम या पालकाने व्यक्त केले.
बाजारात अद्याप गजबज नाही
सोमवारपासून शाळा सुरू होण्याच्या घोषणेसोबतच विद्यार्थ्यांचा गणवेश, बूट यांसह अन्य साहित्याच्या खरेदीचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, बाजारपेठांत अजूनही त्याची गजबज दिसून आलेली नाही. शालेय साहित्य व गणवेश विक्रीचा हंगाम नसल्याने तसेच राज्य सरकारच्या सूचना अचानक आल्यामुळे अनेक विक्रेत्यांकडे त्याबाबतचा मालच उपलब्ध नाही. त्यामुळे पालकांमध्ये याबाबतही संभ्रम आहे. असे असले तरी, अनेक शाळांनी तूर्तास विद्यार्थ्यांना गणवेश सक्ती केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या शालेय गणवेशाचा साठा दुकानात तसाच पडून आहे. गेले दीड वर्ष शाळा बंद असल्यामुळे या गणवेशाची विक्री झालेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून केवळ दोन ते तीन ग्राहक शाळेचा गणवेश खरेदी करून गेले आहेत, अशी माहिती ठाण्यातील शालेय गणवेश विक्रेत्यांनी दिली.
शिक्षकांच्या जलद लसीकरणाच्या सूचना
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, नगरपंचायत आणि नगर परिषद हद्दीतील शाळा सुरू करण्याचे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी बैठकीत दिले. शाळा सुरू करण्याच्या पाश्र्वभूमीवर शिक्षकांचे लसीकरण होणे गरजेचे असून ज्या शिक्षकांचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. अशा शिक्षकांचे लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी आरोग्य विभागास दिले आहेत.
नियमावली
* विद्यार्थ्यांना उपस्थिती बंधनकारक नाही. टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्याच्या सूचना.
* शाळांमध्ये र्निजतुकीकरण करून घेणे आवश्यक.
* एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर. एका वर्गात १५ ते २० विद्यार्थी.
* शाळा नजीकच्या पालिका वा खासगी आरोग्य केंद्राशी संलग्न करून घ्याव्यात.
* पालकांनी स्वत:च मुलांची ने-आण करण्याच्या कल्याण-डोंबिवली प्रशासनाच्या सूचना.
* कल्याण-डोंबिवली, भिवंडीत शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक, कर्मचाऱ्यांची प्रतिजन चाचणी बंधनकारक.
* सामाजिक दायित्व निधीतून हेल्थ क्लिनिक सुरू करा.
* गृहपाठ ऑनलाइन पद्धतीने घेतला जाणार.
* विद्यार्थ्यांनी पुस्तकांची अदलाबदल करू नये.