वन अधिकाऱ्यांकडून घरांना टाळे
ठाणे : कोपरी येथील स्वामी समर्थ मठ परिसरात खारफुटींलगत भराव टाकून घरांचे बांधकाम केल्याप्रकरणी वन विभागाने सहा जणांना नुकतीच अटक केली असून त्यांच्या चौकशीत त्यांनी याच परिसरात आणखी तीन घरे बांधल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. कोपरी येथील स्वामी समर्थ मठ परिसराची जागा वन विभागाच्या राखीव क्षेत्रामध्ये येते. या भागात मोठय़ा प्रमाणात खारफुटी असून विविध पक्षी या ठिकाणी वास्तव्य करतात. गेल्या काही वर्षांमध्ये येथे बेकायदा बांधकामे झालेली आहेत. खारफुटीलगत बेकायदा घरांचे बांधकाम सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या कांदळवन संधारण घटक कक्षास मिळाली. त्यानंतर या पथकाने त्या ठिकाणी जाऊन काम थांबविले होते. तसेच सहाजणांना अटकही केली होती. अटकेत असलेल्या आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी याच परिसरात आणखी तीन पक्की घरे नुकतीच बांधल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पथकाने गुरुवारी सायंकाळी घटनास्थळाची पाहणी करून तलाठींच्या मदतीने पंचनामा केला. तसेच तिन्ही घरांना टाळे ठोकले आहे. या घरांमध्ये कोणीही वास्तव्यास नव्हते. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांनी दिली.