कल्याण : भरधाव रिक्षा खड्ड्यात पलटी होऊन अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कल्याण - भिवंडी मार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल समोर घडली आहे. विशेष म्हणजे या अपघातापूर्वीच याच खड्यात एका नागरिकाचा अपघात झाला होता. त्याच नागरिकाने अपघाताचा केंद्रबिंदू असलेल्या खड्डा मोबाईल कॅमेऱ्यात चित्रिकरण करीत असतानाच एक भरधाव रिक्षा त्याच खड्यात आदळून पलटी होऊन अपघात झाल्याचा प्रकारही कॅमेऱ्यात कैद केला. त्यांनतर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हि घटना समोर आली आहे.
कल्याण-भिवंडी मार्गावर गेल्या तीन वर्षापासून रस्ता रुंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे कासव गतीने काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन कोणी जखमी झाले तर अनेकांचे जीवही गेले आहेत. मात्र अनेक वर्षापासून या रस्त्यावरील खड्याचा प्रश्न अद्यापही सुटला नाही. त्यातच अर्धवट असलेल्या सिमेंट रस्त्यावर जागोजगी खड्डे आहे. असाच एक खड्डा कल्याण - भिवंडी मार्गावरील रांजणोली गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल समोर आहे. याच खड्यामुळे 10 दिवसापूर्वी रिक्षा पटली होऊन अपघात झाला होता. याप्रकरणी त्यावेळी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. त्याच अपघाताच्या थराराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक खड्ड्यांचे साम्राज्य भिवंडी शहर व ग्रामीण भागात पसरले आहे. मात्र जिल्ह्यातील मंत्री, विरोधी पक्ष नेते केवळ या रस्त्याची पाहणी करण्यासाठी येतात. त्याच वेळी संबंधित अधिकारी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केल्याचे दाखवता. मात्र मंत्रीसह नेत्यांची पाठ फिरताच खंड्याचे काम अर्धवट असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे खड्यांच्या राजकारणावरून विरोधी पक्ष असलेले मनसे, भाजपचे लोकप्रतिनिधी व नेते महाविकास आघाडीला जबाबदार धरून रस्ता दुरुस्तीची मागणी करतात. यावर सत्ताधारी मंत्री म्हणतात पावसाळा गेला कि, खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येईल. मात्र तोपर्यंत खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन त्यांमध्ये नागरिकांचा हकनाक बळी जातो. तर काही नागरिक गंभीर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खड्डे दुरुस्तीचा प्रश्न कधी सुटणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
आठवडाभरात एकाच ठिकाणी 7 घटना, बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील वंजार पट्टी नाका ते चाविंद्रा मार्ग निष्कृष्ट असल्याने हे अपघाताचे केंद्रबिंदू ठरत आहे. आठवड्याभरातच या ठिकाणी अपघातांची 7 घटना घडल्या आहेत. याआधी एकाच दिवशी चार अपघात झाल्याने दुचाकीस्वार थोडक्यात बचावले होते. मात्र त्यानंतर देखील भिवंडी महानगरपालिकेला जाग आलेली नाहीये. आठवड्याभरात एकाच ठिकाणी सात दुचाकीस्वारांचे अपघात झाले आणि तेही थोडक्यात बचावले आहेत. या अपघातांचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका आठवड्यात एकाच ठिकाणी सात अपघात घडल्याची बातमी एबीपी माझाने सतत लावून धरली होती. एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन पालिका प्रशासन खडबडून जागी झाले आहे. पालिकेच्या वतीने मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेत पेवर ब्लॉक काढून ते व्यवस्थित बसवण्याच काम हाती घेण्यात आले आहे.