ठाणे : मुंबई महापालिका क्षेत्र वगळता राज्यभरात नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यास परवानगी देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच सांगितले आहे. असे असले तरी ठाणे महापालिकेने नवरात्रोत्सवासाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात गरबा खेळण्यास बंदी राहणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान गरब्याचे आयोजन केले जाऊ नये, असे सांगत पालिका प्रशासनाने गरबा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. यामुळे यंदाही शहरात गरबा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत १३ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ठाणे महापालिकेने नवरात्रोत्सवासाठी शनिवारी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान गरब्याचे आयोजन केले जाऊ नये, असे स्पष्ट केले आहे.