हेलिकॉप्टर राईड, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत जेवण, एक रुपयात बुकिंग, एलआयसी योजनेचा लाभ, विविध बँकांची, फायनान्स कंपन्यांची कर्ज सुविधा अशी विविध प्रलोभने दाखवून ग्राहाकांना आपल्याकडे आकर्षित करून, ठाणे जिल्ह्यामधील शहापुर तालुक्यातील धसई येथे गृहनिर्माण प्रकल्प साकारणाऱ्या कर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांनी अनेक ग्राहकांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ग्राहकांच्या तक्रारीनंतर कर्म इन्फ्रास्ट्रक्चर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही ग्राहकांच्या फ्लॅटच्या नावाची एकही वीट न रचता विविध बँका व फायनान्स कंपन्यांकडून मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम परस्पर कर्म कंपनीच्या नावावर वर्ग करण्यात आल्याचे ग्राहकांनी तक्रारीत म्हटले आहे. तर या सर्व गंभीर प्रकारामुळे अनेक ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे कर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालका विरोधात ग्राहकांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी कर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहापूर तालुक्यातील धसई येथे कर्म पंचतत्व, कर्म इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या बांधकाम व्यावसायिक कंपनीचा हजारो फ्लॅटचा गृहनिर्माण प्रकल्प २०१५ मध्ये सुरू करण्यात आला होता. स्वस्तात घर मिळणार या उद्देशाने ठाणे, मुंबईतील अनेक ग्राहकांची सुरुवातीला घर घेण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. यामध्ये अनेक सेवानिवृत्त कुटुंबांनी ही निवृत्ती पश्चात मिळणारी रक्कम गुंतवली आहे. अनेक इमारती देखील उभ्या राहिल्या आहेत. मात्र असंख्य ग्राहकांची तसेच या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांसह मजुरांची देखील या प्रकल्पात फसवणूक झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुंबई येथील मिलिंद बटावळे यांनी याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
एलआयसी योजनेचा लाभ, विविध बँकांची, फायनान्स कंपन्यांची कर्ज यामुळे मुंबईचे मिलिंद बटावळे त्यांचे मित्र व नातेवाईक यांनी कंपनीच्या या प्रकल्पात घरासाठी बुकिंग केली होती. कर्म इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांनी या २२ ग्राहकांना अक्षरशः चुना लावला आहे. फ्लॅटचे बांधकाम सुरू न करताच या ग्राहकांच्या नावावर विविध बँका व फायनान्स कंपनी कडून कर्ज मंजूर केले व कर्जाची रक्कम परस्पर कर्म पंचतत्वच्या नावावर वर्ग करण्यात आल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. मिलिंद बटावळे त्यांचे मित्र व नातेवाईक यांची दिशाभूल करून कर्म कंपनीने तब्बल दोन कोटी आठ लाख तीन हजार ८३५ इतक्या रकमेची फसवणूक केली असल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.
तसेच, बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांना केलेल्या कामाचे, पुरविलेल्या साहित्याचे तसेच तेथे काम करणाऱ्या मजुरांचे देखील रक्कम थकविली असून याबाबत चौकशी नंतर कर्म इन्फ्रास्ट्रक्चरचे नामदेव जाधव, केतन पटेल, रमाकांत जाधव, रामचंद्र काळे व त्यांचे इतर साथीदार यांच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ग्राहकांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याचे शहापूरचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी सांगितले आहे.