ठाणे : गेले दीड वर्ष करोना प्रादुर्भाव आणि निर्बंधांमुळे घरातल्या एका कोपऱ्यात थिजलेले ‘शिक्षण’ सोमवारपासून पुन्हा एकदा शाळेचे जिने, वर्गखोल्या, बाके आणि फळ्यांवर बागडू लागले. ठाणे जिल्ह्य़ातील अनेक शाळांमध्ये दीड वर्षांनंतर प्रत्यक्ष मुले दाखल झाली. संगणक, स्मार्टफोनच्या छोटय़ाशा खिडकीत दिसणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनीही कुठे गुलाबपुष्प देऊन तर कुठे फुलांचा वर्षांव करून केले तर शिक्षक, वर्गमित्रांची प्रत्यक्ष भेट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.
राज्य सरकारने दिलेल्या परवानगीनुसार ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागातील शाळांत आठवी ते बारावी तसेच ग्रामीण भागांत पाचवी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू झाले. करोनामुळे शाळेपासून दुरावलेली मुले दीड वर्षांनंतर शाळेत येत असल्यामुळे त्यांच्यात भीती, चलबिचल, कुतूहल असण्याची शक्यता गृहित धरून बहुतांश शाळा व्यवस्थापनांनी पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा आणि उत्साहवर्धक ठरेल, याची काळजी घेतली. अनेक शाळांच्या इमारती, वर्गखोल्या फुगे, पताके, फुलांनी सजवण्यात आल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षकगण शाळेच्या प्रवेशद्वारावर उभे होते. शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन तसेच त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. शाळेचा पहिला दिवस कंटाळवाणा वाटू नये, याकरिता विविध उपक्रमही राबवण्यात आले.
ठाण्यातील रघुनाथ नगर भागातील आनंद विश्व गुरुकुल शाळेत पहिल्या दिवशी अभ्यासाची तासिका शिकविण्याऐवजी ठाण्यातील नामवंत साहित्यिकांना आमंत्रित करण्यात आले होते. ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उदय निरगुडकर, प्रा. अशोक चिटणीस, अरुण म्हात्रे आणि दत्तात्रय चितळे यांनी गुरुकुल विद्यालयातील इयत्ता बारावीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांशी वर्गात जाऊन संवाद साधला. अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांना सुरुवातीचे काही दिवस अभ्यासावर भर देण्याऐवजी त्यांचे स्वास्थ्य उत्तम कसे राहील यावर भर दिला जाणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली. शाळेच्या पहिल्या दिवशीही करोना नियमांचे पालन करून शाळेच्या मैदानात योगासन, सूर्यनमस्कार यांसारखे वैयक्तिकरित्या करता येणारे व्यायामाचे प्रकार घेण्यात आले. अंबरनाथमधील आर्यगुरुकुल या शाळेत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्वरउत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक शपथ घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांचा तास
ठाण्यातील नौपाडा भागातील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्त्री शिक्षणाचे प्रणेते धोंडो केशव कर्वे यांच्यावरील कर्ते सुधारक कर्वे हा धडा शिकविला. तसेच विविध विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. सरस्वती मंदिर ट्रस्टच्या नव्या इमारतीत आज पहिल्यांदाच वर्ग भरविण्यात आले होते. शाळेच्या प्रवेशद्वारावर रांगोळी काढण्यात आली होती. तर, महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते शाळेची घंटा वाजवून शाळा सुरू करण्यात आली.
महापौरांची शिकवणी
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिकेच्या शाळा क्र. २३मध्ये आठवीच्या वर्गात नागरिकशास्त्राचा तास घेतला. करोना म्हणजे काय? तो कशामुळे होतो. करोनापासून दूर राहण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे उलगडून सांगत महापौरांनी विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याचा सल्ला दिला. तसेच नागरिकांची कर्तव्ये कोणती? नगरसेवक म्हणजे काय, महानगरपालिकेची रचना कशी असते? नागरिकांचे अधिकार कोणते? शहराचा महापौर कसा निवडून येतो, या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरेही दिली.
कल्याणमधील शारदा मंदिर संस्था संचलित शारदा मंदिर हायस्कूलमध्ये दीड वर्षांनंतर शाळा सुरू होत असल्यामुळे शिक्षकांनी पारंपरिक वेशभुषेत शाळेचा पहिला दिवस साजरा केला. तसेच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी फुगे लावण्यात आले होते.