ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मुख्य जलवाहिनी फुटणे आणि त्यानंतर दुरुस्तीचे काम यामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात गेले पाच दिवस पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती.
पाणी पुरवठ्याच्या गैरसोयीबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही संताप व्यक्त करत पालिकेला इशारा दिला होता. दरम्यान, खिडकाळी येथील जलवाहीनी दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यानंतर रविवार सायंकाळपासून म्हणजेच पाच दिवसानंतर या भागांचा पाणी पुरवठा सुरु झाला. ठाणे महापालिका विविध स्त्रोतांमार्फत शहरात पाणी पुरवठा करते. त्यापैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या स्त्रोतामार्फत कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मुख्य जलवाहीनी फुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नवीन जलवाहीनी टाकण्याचे काम सुरु आहे. याच कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवला होता. काम शनिवारी पुर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. त्याचदरम्यान, खिडकाळी भागात जलवाहीनी फुटली होती.