ठाणे: महाराष्ट्र बंदला ठाणे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंददरम्यान तोडफोडीच्या घटना घडल्या नसल्या तरी ठाण्याच्या उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम यांच्या समोरच काही शिवसैनिकांनी रिक्षा चालकांना मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात शिवसनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेंभीनाका येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकांना शिवसैनिकांनी दांडक्याने मारहाण केली होती. या मारहाणीप्रकरणी उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम, राजेश मढवी, किरण नाकती, गिरीश राजे आणि प्रकाश पायरे या शिवसैनिकांविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोखले रोड, स्थानक परिसरात दुकाने कार्यकर्त्यांनी बंद केली. ठाणे महापालिका परिवहन सेवेची बस वाहतूक सकाळपासूनच बंद होती. तसेच रिक्षांची संख्याही तुरळक होती. त्यामुळे स्थानक परिसरात काहीकाळ प्रवाशांची गर्दी झाली होती.
कल्याणमध्ये शिवाजी चौक, शिळफाटा रस्ता, गोळवली, मानपाडा चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कल्याण, डोंबिवली परिसरातील बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. उल्हासनगर शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पूर्व द्रुतगती महामार्ग अडविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जयहिंदू पक्षाचे बाळासाहेब भोसले यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.