ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची दमबाजी; कल्याणसह अन्य शहरांत संमिश्र प्रतिसाद
ठाणे : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या बंदला ठाण्यात पूर्ण तर जिल्ह्यातील अन्य शहरांत संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून केलेली वातावरणनिर्मिती आणि काही ठिकाणी व्यापारी, रिक्षाचालकांशी करण्यात आलेली अरेरावी यामुळे ठाण्यात दिवसभर शुकशुकाट होता. या बंदचा परिणाम सार्वजनिक वाहतूक सेवेवरही झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल झाले.
बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सकाळपासून पूर्णपणे बंद होती. एसटी, रिक्षाची वाहतूकही तुरळक होती. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांना पायपीट करत रेल्वे स्थानक वा कामाचे ठिकाण गाठावे लागले. बंदचा फायदा घेत अनेक ठिकाणी रिक्षाचालक मीटरपेक्षा कितीतरी पट अधिक भाडे आकारत होते. याच दरम्यान, ठाण्यात काही रिक्षाचालकांना शिवसैनिकांनी दांडक्याने मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना ठाण्याच्या उपमहापौर पल्लवी कदम यांचे पतीही उपस्थित होते. त्यामुळे समाजमाध्यमांवर शिवसेनेविरोधात टीकेची झोड उठविली जात होती.
ठाणे शहरात सकाळी ७ वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात झाली होती. काही बंद समर्थकांनी पूर्व द्रुतगती मार्गावरील ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रिक्षा संघटना असल्याने स्थानक परिसरात शेअर रिक्षा बंद होत्या.
जिल्ह्यातील व्यापारी आणि उद्योजक संघटनांनी लखीमपूर खेरी घटनेचा निषेध केला. परंतु उद्योग आणि व्यापार सुरू ठेवण्याची विनंती त्यांच्याकडून केली जात होती. सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या रॅलीमध्ये शिवसैनिकही सहभागी झाली होते. या कार्यकर्त्यांनी नौपाडा, जांभळीनाका बाजारपेठ, स्थानक परिसर, राममारुती रोड येथील दुकाने बंद करण्यास भाग पाडली. यावेळी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात होता. रॅली पुढे सरकल्यानंतर या भागांतील दुकाने शटर किलकिले करून सुरू करण्यात आली. स्थानक परिसरात सुरू असलेल्या एका उपाहारगृहात शिवसैनिकांनी घुसून ते बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. भिवंडीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रॅली काढण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.
टीएमटीचे लाखोंचे नुकसान
ठाणे : करोना टाळेबंदी शिथिलीकरणानंतर टीएमटीचा आर्थिक गाडा रुळावर येत असतानाच, सोमवारच्या महाराष्ट्र बंदमुळे टीएमटीला १५ ते १७ लाखांचे उत्पन्न बुडाल्याची बाब समोर आली आहे. राजकीय दबावामुळे तसेच बसगाड्यांची तोडफोड होईल या भीतिपोटी कामगारांनी बसगाड्या आगाराबाहेर काढल्या नव्हत्या. आधीच टीएमटी आर्थिक संकटात असतानाच त्यात करोना संकटामुळे टाळेबंदीचा फटका टीएमटीला बसला होता. एरवी टीएमटीला १५ ते १७ लाखांचे उत्पन्न मिळते. पण, करोना काळात सुरुवातीला उत्पन्नात मोठी घट होऊन दररोज केवळ पाच लाखांचे उत्पन्न मिळत होते. टाळेबंदी शिथिलीकरणानंतर प्रवासी संख्येत वाढ होताच उत्पन्न आकडा पुन्हा वाढू लागला. दुसरी लाट ओसरल्यानंतर टाळेबंदी शिथिल झाली आणि करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभाही देण्यात आली. यामुळे गेल्या दोन महिन्यात प्रवासी संख्येत वाढ झाल्याने टीएमटीला दररोज १५ ते १७ लाखांचे उत्पन्न पुन्हा मिळू लागले आहे. यामुळे उपक्रमाचा आर्थिक गाडा काहीसा रुळावर येत असतानाच सोमवारच्या बंदचा टीएमटीला फटका बसला.
अन्यत्र व्यवहार सुरळीत
कल्याण-डोंबिवली, ग्रामीण भागातील दुकाने सोमवारी सकाळी नियमितपणे दुकानदारांनी उघडली. कल्याण, डोंबिवलीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरू केल्यानंतर दुकाने बंद करण्यात आली. मात्र, येथे शिवसैनिकांचा सहभाग तुरळक होता. कल्याण पूर्वेतील भागात शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. डोंबिवलीत मात्र, शिवसेनेने आक्रमक भूमिका न घेतल्याने तेथील व्यवहार सुरळीत होते. डोंबिवली एमआयडीसीतील सर्व उद्योग सुरळीत सुरू होते. कंपनीत येणाऱ्या कामगारांना कोणीही कुठे अडविले नाही, असे उद्योजकांनी सांगितले. शहापूर, मुरबाड तालुक्यातील भाजी, फळ, धान्य बाजार नियमितपणे सुरू होते. मुरबाड, शहापूर येथील एसटीची सेवा वेळेवर सुरू होती.
अंबरनाथ, बदलापुरात बंद यशस्वी
अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत दोन्ही शहरांतील अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापने बंद होती. बदलापुरातील सकाळी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आशीष दामले आणि कालिदास देशमुख, कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय जाधव यांनी पदाधिकाऱ्यांसह शहरातल्या बाजारपेठांमध्ये फेरी मारत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. तर अंबरनाथमध्येही महाविकास आघाडीचे पदाधिकारी बंदवर लक्ष ठेवून होते.
बंदविरोधात भाजप रस्त्यावर
व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उल्हासनगर शहरातील काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली असली तरी काही दुकाने सुरूच होती. भाजपचे आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वानी भाजप नगरसेवकांसह बाजारपेठांमध्ये फिरून दुकाने उघडण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करताना दिसले. त्यामुळे महाराष्ट्र बंदच्या घोषणेवरून महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा थेट सामना शहरात पाहायला मिळाला. त्याचा फटका व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना बसला.