डोंबिवली : संघर्ष करून भारतीय मजदूर संघाचे संस्थापक, द्रष्टे विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांनी राष्ट्र, मानवता, मानवी समाजाचा उन्नतीसाठी कार्य केले. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने राष्ट्रऋषी होते, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी ज्येष्ठ विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांच्या कार्याचा गौरव केला.
दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्हा व ठेंगडी जन्मशताब्दी समितीतर्फे ‘दत्तोपंत ठेंगडी-द्रष्टा विचारवंत’ ग्रंथाचे प्रकाशन टिळकनगरमधील पेंढरकर सभागृहात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. प्राचार्य श्याम अत्रे यांनी ग्रंथाचे संपादन केले आहे. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. अनिरुद्ध देशपांडे, मजदूर संघाचे माजी अध्यक्ष सी. के. सजीनारायण, कल्याण जिल्हा संघचालक डॉ. विवेक मोडक, जन्मशताब्दी समितीचे मधुकर चक्रदेव, अॅड. अनिल ढुमणे या वेळी उपस्थित होते.
देश, विदेशात विविध प्रकारचे विचार, मतप्रवाह वाहात आहेत. अशा परिस्थितीत मानवतेच्या उत्कर्षांसाठी काय केले पाहिजे हे समाजाच्या प्रत्येक घटकाला कळण्यासाठी दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवन कार्यावरील ग्रंथ शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक संस्था पातळीवर गेला पाहिजे. या पुस्तकाची पारायणे झाली पाहिजेत, अशा शब्दात होसबाळे यांनी ठेंगडी यांच्या कार्याचा गौरव केला. या पुस्तकाची विविध व्यासपीठांवर चर्चा घडवून आणली पाहिजे, असे मत प्रा. देशपांडे यांनी व्यक्त केले.