डोंबिवली: अनेक नोकरदार अजूनही घरातून कार्यालयीन कामे करीत आहेत. एकेका घरात दोन ते तीन जणांचे कार्यालयीन काम. त्यांचे मोबाइलवरील बोलणे, घरातील लहान मुलांचा धिंगाणा. त्यामुळे घरात शांततेने, मन लावून अभ्यास करता येत नसल्याने अशा घरांमधील स्पर्धा तसेच महाविद्यालयीन परीक्षा देणारे विद्यार्थी अभ्यासिकांकडे वळले आहेत. करोना संसर्गामुळे अभ्यासिकांमध्ये ५० टक्के उपस्थितीची अट असल्याने विद्यार्थी, अभ्यासिका चालकांची मोठी अडचण झाली आहे.
डोंबिवली, कल्याणमधील सेवाभावी वृत्तीने, व्यावसायिक पद्धतीने सेवा देणाऱ्या १० ते १५ अभ्यासिका आहेत. सेवाभावी वृत्तीने सेवा देणाऱ्या अभ्यासिकांमध्ये १०० ते १५० रुपये मासिक दरात विद्यार्थ्यांना अभ्यास करता येतो. अशा अभ्यासिकांकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा आहे. खासगी व्यावसायिक अभ्यासिकांमध्ये ८०० ते ९०० रुपये मासिक दर आकारला जातो. बहुतांशी अभ्यासिकांची आसनक्षमता १५० ते २०० आहे. करोना प्रतिबंधक नियमांमुळे अभ्यासिका चालकांना निम्म्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत प्रवेश द्यावा लागतो. एका बाकडय़ावर एक विद्यार्थी बसविला जातो. इतर विद्यार्थी जागा असूनही बसविता येत नाहीत, अशी खंत अभ्यासिका चालकांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र लोकसेवा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, सनदी लेखापाल, अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुविशारद, कायदा, महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यासिकांचे सदस्य आहेत. अनेक मुले चाळ, झोपडी भागात राहतात. त्यांना अभ्यासिका मोठा आधार असतो. उच्चभ्रू वस्तीमधील मुले घरातील गजबजलेल्या वातावरणामुळे आणि विद्यार्थी समूहात शांतपणे अभ्यास करता येत असल्याने अभ्यासिकांना पसंती देतात, असे कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. राजीव जोशी यांनी सांगितले. सार्वजनिक वाचनालयाची कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावर रिजन्सी सोसायटीत १५० आसन क्षमतेची अभ्यासिका आहे.
डोंबिवलीत विवेकानंद सेवा मंडळाचे इंजिनीअिरग, वैद्यकीय, कायदा अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे ग्रंथालय आहे. या मंडळाची १२० आसनक्षमतेची डोंबिवली पूर्वेतील संगीतावाडीमध्ये अभ्यासिका आहे. करोना प्रतिबंधक नियमांमुळे गेल्या दीड वर्षांपासून अभ्यासिका बंद आहे. स्पर्धा परीक्षा इतर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासिका सुरू करा, असा तगादा लागला आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधाचे नियम पाळून ५० टक्के क्षमतेत सोमवारपासून अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे विवेकानंद सेवा मंडळाचे कार्यकर्ते अनिल मोकल यांनी सांगितले.
डोंबिवलीत गणेश मंदिर संचालित आचार्य अत्रे वाचनालयात १५० आसनक्षमतेची अद्ययावत अभ्यासिका आहे. ५० टक्के क्षमतेने ही अभ्यासिका सुरू केली आहे. अभ्यासिकेव्यतिरक्त ज्येष्ठ नागरिक कट्टा, वाचनालय, संगणक, अंध संगणक कक्षाच्या जागा अभ्यासिकेसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. दीड वर्ष विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. या परीक्षा आता होऊ घातल्या आहेत. अशा निर्णायक क्षणी विद्यार्थी शांत जागा म्हणून अभ्यासिकांना प्राधान्य देत आहेत, असे अत्रे वाचनालय अभ्यासिकेचे समन्वयक प्रवीण दुधे यांनी सांगितले.
डोंबिवलीत राजाजी रस्ता येथे पै फ्रेन्ड्स ग्रंथालयाची १०० आसन क्षमतेची अभ्यासिका आहे. २४ तास ही अभ्यासिका सुरू आहे.
करोना महासाथीने गेल्या दीड वर्षांत महाविद्यालयीन, स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. या परीक्षा आता होऊ घातल्या आहेत. बहुतांशी नोकरदार अजून घरातून काम करतो. अनेक घरांमध्ये निवांत वातावरण नाही. यासाठी अभ्यासिका हा शांतपणे अभ्यास करण्यासाठी उत्तम पर्याय असल्याने शासनाने अभ्यासिका पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी.
– प्रियांका दुधे, डोंबिवली
करोना प्रतिबंधाचे नियम प्रत्येक रहिवासी पाळतो. विद्यार्थी आपली काळजी घेऊन महाविद्यालय, वाचनालय, अभ्यासिकेत जात आहेत. प्रत्येकाला आपली काळजी आहे. ५० टक्के क्षमतेत अभ्यासिका सुरू झाल्याने उर्वरित विद्यार्थ्यांची परवड होत आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा.
– धनश्री परुळेकर, डोंबिवली