डोंबिवली : करोना महासाथीच्या दीड वर्षात नाट्यक्षेत्राचे खूप नुकसान झाले. नाट्यक्षेत्राला पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने नाट्यगृहांच्या भाड्यात पुढील वर्षापर्यंत सूट द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रशांत दामले यांनी शनिवारी येथे केली.
डोंबिवलीत सावित्रीबाई फुले रंगमंदिरात दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचा प्रयोग होता. करोना साथीनंतर डोंबिवलीत प्रथमच होत असलेल्या या नाटकाला रसिकांनी तिकीट खरेदीतून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नटराजाचे पूजन करुन नाटकाला सुरुवात झाली. ‘यापुढे करोनाची नव्हे तर नाट्यप्रेमींच्या टाळ्यांची लाट येऊ दे’ असे गाºहाणे दामले यांनी घातले.
करोना साथीने नाट्यसंस्था, लेखक, कलाकार, पडद्यामागचे कलाकार अशा सर्वांचे खूप नुकसान केले. याविषयी आता बोलणे अधिक उचीत होणार नाही. दीड वर्षात समाजाच्या प्रत्येक घटकांसह प्रत्येक कलाकाराला विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. पण नाट्यकर्मींनी कधी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली नाही. हा विचार करून शासनाने २०२२ पर्यंत नाट्य कलाकारांना दिलासा देण्यासाठी नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी, अशी मागणी दामले यांनी केली.
शासनाने अशाप्रकारचा दिलासा दिला तर २०२३पर्यंत नाट्य क्षेत्राला पहिल्यासारखी उर्जितावस्था येईल, असा विश्वास आहे, असे दामले म्हणाले. नाट्यक्षेत्र बंद असल्याने रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक, कलाकार नाईलाजाने मालिकांकडे वळले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. नाट्यक्षेत्र एका मोठ्या संक्रमणातून जात आहे. त्यामधून बाहेर काढण्यासाठी शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी नाट्यकर्मींची मागणी आहे, असे दामले म्हणाले.