ठाणे : दिवाळी निमित्ताने रविवारी सायंकाळी जांभळीनाका आणि नौपाडा येथील बाजारपेठांत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. सलग दुसऱ्या दिवशी ठाणे स्थानक परिसर, कोर्टनाका, सिडको रस्ता, नौपाडा भागात वाहतूक कोंडी झाली. वाहन चालकांना अवघे १० ते १५ मिनिटांचे अंतर पार करण्यास पाऊण तास लागत होता.
ठाणे, कळवा येथील विविध भागातून नागरिक जांभळीनाका, नौपाडा येथील बाजारपेठेत खरेदीसाठी येतात. रविवार असल्याने यात भर पडून त्याचा परिणाम येथील वाहतूकीवर झाला. जांभळीनाका येथे झालेल्या गर्दीमुळे वाहतूक पोलिसांनी बाजारपेठेतील टीएमटी बसगाडय़ांची वाहतूक टॉवर नाका मार्गे वळविली होती. त्यामुळे टॉवरनाका, टेंभीनाका, कोर्टनाका परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. सिडको, खारटन रोड परिसरातही वाहतूक कोंडी झाली होती. कळवा पूल, ठाणे पोलीस मुख्यालयाजवळील रस्त्यावर बसगाडय़ांच्या रांगा लागल्या होत्या. सिडको मार्गावर तिसऱ्या खाडी पूलाचेही काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.
गोखले रोड, राम मारूती रोड परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्याही नाकी नऊ आले होते.
करोना निर्बंध धाब्यावर करोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्याप कायम आहे. मात्र, बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी आलेल्या अनेकांच्या चेहऱ्यावर मुखपट्टी नव्हती. तसेच अंतर सोवळय़ाच्या नियमांचाही फज्जा उडाला.