ठाणे, डोंबिवली : कल्याण-शीळ रस्त्यावरील शिळफाटा परिसरात शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीची जलवाहिनी पुन्हा फुटल्याने ऐन दिवाळीत ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, डोंबिवली एमआयडीसी, २७ गाव परिसराचा पाणीपुरवठा बंद झाला. दुरुस्तीचे काम पूर्ण करून शनिवार दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो कमी दाबाने होत असल्याने या सर्वच भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या कायम होती. सातत्याने जलवाहिनी फुटून पाणीपुरवठा बंद होत असल्यामुळे नागरिकांसह राजकीय नेत्यांकडून नाराजीचा सूर उमटू लागला असून डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयावर हंडा-बादली मोर्चा काढला होता.
ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना एमआयडीसीकडून दररोज ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, डोंबिवली एमआयडीसी, २७ गाव परिसर, अंबरनाथ, उल्हासनगर या भागांचा समावेश आहे. या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिन्या जुन्या झाल्या असून त्या सातत्याने फुटण्याचे प्रकार घडत आहेत. शुक्रवारी सायंकाळी शिळफाटा येथील चिंतामणी हॉटेल परिसरात एमआयडीसीची ६२.६० इंचाची जलवाहिनी पुन्हा फुटली. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन ते जवळच्या झोपडपट्टी भागात पाणी साचले होते. अनेकांच्या घरातील फर्निचर, सामानाची नासाडी झाली. येथील सुमारे दहा रहिवाशांना अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढले. पाणी मुख्य रस्त्यावर आल्याने काही भागांत वाहतूक कोंडी झाली.
दिवाळी सणाच्या काळात घरी पाणी नसल्याने डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील रहिवाशांनी शुक्रवारी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयासमोर जमून आंदोलन केले. हंडा, बादली घेऊन रहिवासी आंदोलनात सहभागी झाले होते. रहिवाशांनी सतत निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. कार्यालयाला सुट्टी असल्याने एका कर्मचाऱ्याने उपस्थित राहून पाणीटंचाईमधील अडचणी रहिवाशांना सांगितल्या. तसेच लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, २७ गाव परिसरातील नागरिकांमधूनही नाराजीचा सूर उमटत होता. दरम्यान, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम पूर्ण करून शनिवार दुपारनंतर पाणीपुरवठा सुरू केला; परंतु पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने या सर्वच भागांत पाणीटंचाईची समस्या कायम होती.
घटनांची चौकशी करा
शहरांना वर्षभर मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून एकीकडे शासन आठवड्यातून दोन वेळा पाणीकपातीचा निर्णय घेते. त्याच वेळी शिळफाटा रस्त्यावर दर महिन्याला जलवाहिनी फुटून शेकडो लिटर पाणी फुकट जाते. या फुकट जाणाऱ्या पाण्याला जबाबदार कोण याची चौकशी करुन एमआयडीसी, विशेष तपास पथकाद्वारे या जलवाहिन्या फुटी प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी वास्तुविशारद संदीप पाटील यांनी केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई, एमआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांना भेटून या प्रकरणाची माहिती देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
आव्हाड यांची नाराजी
एमआयडीसीची जलवाहिनी सातत्याने फुटून निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येसंदर्भात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट संदेशातून नाराजी व्यक्त केली आहे. जलवाहिनी फुटली हे एमआयडीसीचे नेहमीचेच रडगाणे आहे. या प्रकारामुळे ठाण्यातील जनता कंटाळली आहे. खास करून कळवा, मुंब्रा, शीळ, दिवा येथील जनतेचे होणारे हाल बघवत नाहीत. हजारो कोटींची गटार योजना करण्यापेक्षा त्या गटारात पाणी जाण्याइतके पाणी तरी शहराला द्या. महापालिकेने यामधून हात काढू नये, असे सांगत मंत्री आव्हाड यांनी सत्ताधारी शिवसेनेसह पालिकेच्या कारभारावर टीका केली.