ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलाच्या मुख्य जुन्या मार्गिका येत्या दोन दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्याचा विचार ठाणे वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. मुख्य पुलाचे काम सुरू झाल्यास वाहतुकीचा भार कसा राहील तसेच वाहतूक पर्यायी मार्गाने वळविल्यास कोणत्या ठिकाणी कोंडी होऊ शकते, याची चाचपणी वाहतूक पोलिसांकडून केली जात आहे. नव्या मार्गिकांचे काम सुरू केल्यास येथील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी किती मनुष्यबळ लागू शकते हेदेखील या प्रयोगादरम्यान पाहिले जाणार आहे.
मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करण्यासाठी कोपरी रेल्वे उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग धोकादायक तसेच अरुंद असल्याने २०१८ पासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मध्य रेल्वेकडून हा उड्डाणपूल तोडून आठ पदरी पूल करण्याचे काम सुरू आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी दोन आणि मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येण्यासाठी दोन पदरी मार्गिकांचे काम पूर्ण झाले असून या मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे. ही वाहतूक सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासून कोपरी भागात होणारी कोंडी खूपच कमी झाली आहे. असे असले तरी येत्या काही दिवसांत मुख्य पुलाचे काम एमएमआरडीए आणि मध्य रेल्वेकडून घेतले जाणार आहे. मुख्य मार्गावर काम सुरू झाल्यास कोपरी येथील सेवा रस्त्यावर वाहनांचा भार वाढणार आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच ठाणे वाहतूक शाखा, ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक झाली. सेवारस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची विनंती ठाणे वाहतूक पोलिसांनी महापालिकेस केली होती. त्यानुसार सेवारस्त्यांवर काही प्रमाणात खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच मुख्य मार्गावरून सेवा रस्त्याच्या दिशेने येण्यासाठी पदपथ तोडून एक डांबरी रस्ताही तयार करण्यात आला आहे.
दोन दिवसांत नियोजन
ही कामे पूर्ण झाल्याने वाहतूक पोलीस येत्या दोन दिवसांत मुख्य पुलाच्या भागातील प्रवेशाजवळ अडथळे उभारणार आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेत दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना सेवा रस्तामार्गे प्रवेश दिला जाणार आहे. कार किंवा मोठी वाहने नव्या पुलावरून जाऊ शकतील, असे नियोजन केले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हे बदल असणार आहेत. या बदलामुळे कोणत्या भागात किती वेळ वाहतूक कोंडी होऊ शकते, किती मनुष्यबळ लागू शकते याची चाचपणी वाहतूक पोलिसांना करता येणे शक्य होणार आहे. ही चाचपणी झाल्यानंतर आवश्यक ते बदल करून पुन्हा आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती वाहतूक पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. त्यानंतर पूलनिर्मितीला वाहतूक पोलिसांकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.