ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल १,०८६ किलो गांजा ठाणे पोलिसांच्या अमलीविरोधी पथकाने जप्त केला आहे. बाजारात या गांजाची किंमत दोन कोटी रुपयांहून अधिक आहे. गांजाशिवाय इतर अमली पदार्थही पोलिसांना आढळून आले आहेत. मात्र त्याचे प्रमाण गांजाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
राज्यात गांजाविक्री आणि सेवनाला बंदी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील नशेबाज आणि तस्करांकडून परराज्यातून येणाऱ्या गांजाची मोठी मागणी निर्माण झाली आहे. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरांत ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी १ जानेवारी २०२० ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत १ हजार ८६ किलो ६५२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या गांजाची एकूण किंमत २ कोटी २० लाख १९ हजार ५२६ आहे. या कारवाईंमध्ये पोलिसांनी ४५ गुन्हे दाखल केले असून ६५ तस्करांना आणि गांजा बाळगणाऱ्यांना अटक केली आहे. तसेच १३० हून अधिक जणांना गांजाचे सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
राज्यात गांजाला बंदी असली तरी देशातील काही राज्यांमध्ये गांजाची शेती होती. ठाण्यात सर्वाधिक गांजा हा ओदिशा, तेलंगणा, विशाखापट्टणम या भागांतून येत असतो, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांनी दिली. गांजा हा स्वस्त असल्याने तसेच सहज उपलब्ध होत असल्याने गांजासेवनाचे प्रमाण अधिक असल्याचेही ते म्हणाले.
काहींची किंमत अधिक
इतर अमली पदार्थामध्ये मेथएम्फेटामाईन, एमडी, चरस, एलएसडी पेपरची मागणीही आहे. मात्र, या अमली पदार्थाची किंमत अधिक असते. त्यामुळे अतिश्रीमंत तरुणांकडूनच या अमली पदार्थाची खरेदी केली जाते.
गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या तसेच सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत महाविद्यालय आणि शाळांमध्ये अमली पदार्थाचे दुष्परिणामासंदर्भात जनजागृती करण्यात येईल.
– अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण शाखा