ठाणे : करोना प्रतिबंधक लशींच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्या प्रवाशांना उपनगरीय रेल्वेचे तिकीट किंवा मासिक पासवर रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दररोज उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र, प्रत्येक प्रवाशाचे लस प्रमाणपत्र पडताळणी करून तिकीट देण्याच्या प्रक्रियेत जास्त वेळ जात असल्यामुळे तिकीट खिडक्यांसमोर लांबलचक रांगा लागत आहेत.
रेल्वे स्थानकात प्रवाशांना स्वयंचलित तिकिटाची सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणा अद्याप सुरू करण्यात आल्या नसल्यामुळे नाईलाजाने प्रवाशांना तिकिटासाठीच्या रांगेत वेळ खर्ची घालवावा लागत आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून लशींची दोन मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ३२ लाख नागरिकांना लशीची दुसरी मात्रा मिळाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दीही वाढली आहे. प्रवाशाला मासिक पास किंवा दैनंदिन तिकीट देण्यापूर्वी तिकीट खिडक्यांवरील रेल्वे कर्मचारी त्याचे युनिव्हर्सल पास किंवा लशींच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तपासतात. हे प्रमाणपत्र तपासल्यानंतरच प्रवाशाला तिकीट किंवा पास दिला जातो.
या प्रक्रियेत बराचसा वेळ निघून जातो. त्यामुळे ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर येथील तिकीट खिडक्यांवर प्रवाशांच्या रांगा लागत आहे. या रांगांमुळे अंतर नियमांचेही उल्लंघन होत असते. अनेकदा मासिक पास काढणाऱ्या प्रवाशांनाही पास वेळेत मिळत नसल्याने लोकल पकडताना दमछाक होते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहचण्यासही उशीर होत आहे.
नियोजनाचा अभाव
लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या प्रवाशांना तिकीट उपलब्ध करण्यापूर्वी स्थानकात किती तिकीट खिडक्या उपलब्ध आहेत याची माहिती घेऊन वेगवेगळे पर्याय आखणे गरजेचे होते. परंतु तसे झालेले नाही. प्रशासनाने आता जेटीबीएस आणि एटीव्हीएम प्रणाली सुरू करणे गरजेचे आहे, असे मत उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या उपाध्यक्ष लता अरगडे यांनी व्यक्त केले. करोना प्रतिबंधक लशीच्या मात्रा अपूर्ण असलेल्या प्रवाशांना तिकीट वितरित केली जाणार नाही. यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद द्यावी. यंत्रणा सुरू झाल्यास गर्दी कमी होऊ शकते. तसेच या यंत्रणेवर काम करणाऱ्यांचे रोजगारही पुन्हा सुरू होऊ शकतात, असे त्या म्हणाल्या.
करोना प्रतिबंधक लशीची एक मात्रा घेतलेल्या प्रवाशांना अद्यापही प्रवास करू दिला जात नाही. दुसरीकडे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचा भार रेल्वे वाहतुकीवर आलेला आहे. तिकीट खिडक्यांवर दररोज गर्दी होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तात्काळ ‘जेटीबीएस’ सेवा सुरू करावी.