उल्हासनगर: उल्हासनगर शहरातील सिंधीबहुल भागात ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेने येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीची घोषणा केली आहे.
उल्हासनगर महापालिकेवर अनेकदा भगवा फडकावूनही शहराच्या सिंधीबहुल भागात अजूनही अस्तित्व निर्माण करण्यात शिवसेनेला यश आले नाही. शहरातील सिंधीबहुल भागात कलानी कुटुंबीयांचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यामुळे सत्तेचा मार्ग सोपा करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भाजपपासून दुरावलेल्या कलानी कुटुंबीयांना जवळ करण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले होते. लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मते मागण्यासाठी खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना टीम ओमी कलानी आयोजित सभेतील मंचावर जाण्याची वेळ आली होती. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून शहरात सक्रिय असलेल्या पप्पू कलानीमुळे शहरातील वातावरण बदलू लागल्याचे दिसताच शिवसेनेने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या कलानी गटाला चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले. गेल्याच आठवडय़ात स्थानिक शिवसेना नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांची बैठक पार पडली.
जिल्ह्यातील इतर शहरांमध्येही शिवसेनेशी आघाडी करण्यासाठी हालचाली करण्याचे आदेश खुद्द गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. या माध्यमातून शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपले अस्तित्व निर्माण करून इच्छिते आहे. मात्र आपले वर्चस्व असलेल्या शहरांमधील शिवसेनेचे नेतृत्व मात्र स्वबळावरच लढण्याचा आग्रह धरत असल्याचे दिसते आहे.