कल्याण : कल्याण पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणुका आज संपन्न झाली. साधारण वर्षापूर्वी उपसभापती पदासाठी बंडखोरी करत शिवसेनेचे सदस्य नितीन ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि इतर राजकीय पक्षांसोबतच्या सदस्यांसोबत हातमिळवणी करत नितीन ठोंबरे हे उपसभापती पदावर विराजमान झाले.
मात्र, पक्षाचा अधिकृत उमेदवार आणि त्यानंतर देखील ठोंबरे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. अखेर न्यायालयाच्या निर्णयानुसार ठोंबरे यांचे पद रद्द करण्यात आले.
त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून भरत भोईर यांना उमेदवारी देण्यात आली होती. आज झालेल्या निवडणुकीत भरत भोईर हे बिनविरोध निवडून येत उपसभापती पदी विराजमान झाले आहेत. भरत भोईर यांना उपसभापती पद मिळाल्याने 14 गावातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.