ठाणे : ठाणे महापालिका निवडणुका तोंडावर असताना राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातील संघर्ष टोक गाठू लागला असून कळवा येथील एका कार्यक्रमात या दोघांमध्ये विकासकामांचे श्रेय घेण्यावरून जुगलबंदी पाहायला मिळाली.
विकासकामांसाठी निधी हवा असेल तर सरकारकडे जाण्यास काही अर्थ नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे गेल्यास तात्काळ निधी मिळतो. कारण मुलासाठी वडील केव्हाही तयार असतात, अशी कोपरखळी मंत्री आव्हाड यांनी मारताच मुंब्रा शहराचा अजून विकास करायचा असल्यास नगरविकास विभाग आपल्याला नक्की निधी देईल असे उत्तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले.
त्यावर गेल्या दोन वर्षांपासून २५ कोटी रुपयांचा निधी मागतो आहे तर तो मिळत नाही अशी खंत आव्हाड यांनी व्यक्त करताच संयमाचे फळ नक्कीच मिळते अशा शब्दात खासदार शिंदे यांनीही टोलेबाजी केली. आव्हाड यांचा विधानसभा मतदारसंघ असलेला कळवा-मुंब्रा परिसर खासदार शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडतो. महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने खासदार शिंदे यांनी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, कळवा, मुंब्रा भागात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.