कार्यलयात थुंकण्यास विरोध करणाऱ्या आरटीओ लिपिकाला एका एजंटने मारहाण केल्याची घडली कल्याण आरटीओ कार्यलयात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात मच्छिंद्र केणे या एजंटविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याणच्या उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामासाठी आलेला एजंट मच्छिंद्र केणे हा आरटीओ कार्यलयातच थुंकला .यामुळे आरटीओ कार्यालयात लिपिक पदावर कार्यकरत असणाऱ्या मनीष जाधव यांनी त्याला हटकले. मनीष यांनी मच्छिंद्र केणेला कार्यालयाबाहेर जाण्यास सांगितले. मनीष यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे संतापलेल्या केणेने मनीष यांना धमकी दिली. त्यानंतर केणे तिथून निघून केला.
दुपारच्या सुमारास घडलेला हा प्रकार मनीष जाधव विसरलेही. मात्र संध्याकाळी सहा वाजता काम संपवून आरटीओ कार्यालयाबाहेर पडलेल्या मनीष यांना केणेने आपल्या साथीदारांसह बेदम मारहाण केली. या मारहाणीत मनीष यांच्या हाताला दुखापत झाली असून या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात मनीष यांनी तक्रार दाखल केली आहे.
मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटना ठाणे विभागाच्या वतीने या घटनेचा निषेध केला असून आज ठाणे जिल्ह्यातील चारही आरटीओ कार्यालयातील कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.