प्रवाशांना तिकिटासाठी द्रविडीप्राणायम
डोंबिवली : ठाकुर्ली पूर्व रेल्वे फाटकाजवळ गेल्या काही महिन्यांपासून बांधून पूर्ण असलेले तिकीट घर रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात येत नसल्याने रेल्वे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी सध्या ठाकुर्ली पश्चिम फलाट एकवर जावे लागते किंवा पूर्व भागात म्हसोबा चौक भागात कल्याण दिशेकडे असलेल्या तिकीट खिडकीचा मार्ग धरावा लागतो.
ठाकुर्ली पूर्व भागात म्हसोबा चौक कल्याण बाजुला तिकीट खिडकी असली तरी खूप दूर अंतरावर आहे. या तिकीट खिडकीजवळ जाण्यासाठी प्रवाशाला हनुमान मंदिर रस्ता, संतवाडीतून जावे लागते. डोंबिवलीतील पेंडसेनगर, सारस्वत वसाहत, गणेश मंदिर, महिला समिती, नेहरु मैदान भागातून येणाऱ्या प्रवाशांना म्हसोबा चौक भागातील खिडकी दूर अंतरावर पडते. म्हसोबा चौकाकडे जाताना अनेक वेळा प्रवाशांना वाहन कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे डोंबिवली, महिला समिती शाळा, चोळे भागातील प्रवासी म्हसोबा चौक तिकीट खिडकीकडे जाण्यास तयार होत नाहीत, असे प्रवाशांनी सांगितले.
ठाकुर्ली पूर्व रेल्वे फाटकाजवळ नवीन खिडकी सहा महिन्यापूर्वी बांधून तयार आहे. नवीन जिन्या लगत ही खिडकी आहे. त्यामुळे तिकीट काढून प्रवाशांना थेट फलाटावर जाता येते. ही खिडकी बंद असल्याने डोंबिवली पूर्व, ठाकुर्ली पूर्व भागातून येणाऱ्या प्रवाशांना नवीन जिन्यावरुन ठाकुर्ली पश्चिमेला रस्त्यावर उतरावे लागते. वळसा घेऊन नवीन फलाटावरील तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट काढावे लागत असल्याचे ठाकुर्लीतून नियमित प्रवास करणारे प्रवासी मंदार अभ्यंकर यांनी सांगितले. तिकिटासाठी जिन्यांची चढ उतार हे मोठे आव्हान प्रवाशांसमोर असते. ज्येष्ठ, वृध्द नागरिकांना अशी चढ उतार शक्य होत नाही, असे प्रवाशांनी सांगितले. अनेक प्रवासी हा द्रविडीप्राणायम टाळण्यासाठी तिकीट काढत नाहीत आणि प्रवास करतात.
नवीन तिकीट घरातील तांत्रिक, बांधकाम स्वरुपाची कामे शिल्लक आहेत. लवकरच ती पूर्ण करुन हे तिकीट घर सुरू केले जाणार आहे.
– प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे
ठाकुर्ली पूर्व रेल्वे फाटकाजवळील तिकीट खिडकी रेल्वेने सुरू करावी म्हणून प्रवाशांची मागणी आहे. सध्या पष्टिद्धr(१५५)मेत जाऊन तिकीट काढावे लागेत. यामध्ये प्रवाशांचे हाल होतात.
– मंदार अभ्यंकर, प्रवासी, ठाकुर्ली