कल्याण : डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील गाळे तोडण्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. दंड न भरल्यास आणखी सहा महिने कारवास होईल.
शरद गंभीरराव, तात्यासाहेब माने आणि सदानंद थरवळ अशी शिक्षा झालेल्या माजी नगरसेवकांची नावे आहेत. पंधरा वर्षांपूर्वी पालिकेच्या सावळाराम महाराज क्रीडा संकुलात अनधिकृत गाळे बांधण्यात आले होते. हे गाळे तोडण्याची कारवाई सुरू असताना या तिन्ही माजी नगरसेवकांनी त्या कामात अडथळा आणल्याचा आरोप होता. याबाबत तत्कालीन उपायुक्त रवींद्र वाघ यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायधीश एस. एस. गोरवाडे यांनी या तिघांना दोषी ठरवत दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली, असे ज्येष्ठ सरकारी वकील अॅ ड. सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.
या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सदानंद थरवळ आणि तात्यासाहेब माने यांनी सांगितले. डोंबिवलीचे उपायुक्त वाघ हे कधीच कार्यालयात हजर राहत नव्हते. त्यांना महासभेत, कार्यालयात आम्ही जाब विचारला होता. पण क्रीडा संकुलातील गाळ्यांचा विषय त्यांनी कोठून आणला हे आम्हाला शेवटपर्यंत कळले नाही. क्रीडा संकुल आम्हा तिघा नगरसेवकांच्या प्रभागात नव्हते. तेथील गाळे वाचविण्याचा प्रश्न नव्हता, असे त्यांचे म्हणणे आहे.