ठाणे : ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू आणि जिल्हाधिकारी एकत्रित चर्चा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्यानंतरच परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घ्यायची याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तसेच दोन लसमात्रा घेतलेल्या नाहीत, अशा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाइलाजाने ऑनलाइनच घ्याव्या लागतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
प्र-कुलपती नेमणुकीसाठी आम्ही केंद्र शासनाच्या पद्धतीचा अवलंब केला असून या निर्णयाबाबत आमच्यावर नाही तर केंद्र शासनाच्या कार्यपद्धतीवर एक प्रकारे संशय घेतला जात असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.
ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये रविवारी सायंकाळी ग्राममंगल आणि आंतरभारती या संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण परिषद कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत आणि प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांबाबत काय निर्णय घ्यायचे, याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कुलगुरू आणि जिल्हाधिकारी जिल्ह्यातील परिस्थिती पाहून त्या ठिकाणी परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन घ्यायची याबाबतचा निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुलगुरू नेमण्याचा राज्यपालांचा अधिकार काढून घेतलेला नसून गैरसमज पसरविले जात आहेत. राज्यपालांचा अधिकार अबाधित ठेवत शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी त्या समितीवर दोन माजी कुलगुरूंची नेमणूक केली आहे. तीन जणांची समिती होती, ती आता पाच जणांची समिती होणार आहे, असे सामंत म्हणाले.
‘संशय केंद्र सरकारच्या प्रक्रियेवरच’
केंद्रीय विद्यापीठांमध्ये कुलगुरूच्या नेमणुकीसाठी शोध समिती केंद्र शासनाला अहवाल सादर करते. कुलगुरूंच्या नावांचा हा अहवाल केंद्र शासन राष्ट्रपतींना देते आणि त्यानंतर राष्ट्रपती कुलगुरूंची नावे जाहीर करतात. ही पद्धत राज्य शासन राबवीत आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत आमच्यावर नाही तर केंद्र शासनाच्या कार्यपद्धतीवर एक प्रकारे संशय घेतला जात आहे, असा दावाही त्यांनी केला.